श्रीनगर – जम्मू काश्मिरमध्ये आघाडी सरकराचा पाठिंबा काढल्यामुळे पीडीपी भाजप आघाडीचं सरकार पडलं होतं. त्यामुळे तिथे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. सरकार पडल्यामुळे सत्तेची उब नसलेले पीडीपीचे काही आमदार आता बंडाच्या पवित्र्यात आहेत अशी माहिती आहे. काही आमदार तर पक्षाच्या विरोधात थेट बोलत आहेत. पक्षात घराणेशाही सुरू असल्याचा त्यांचा आरोप आहे. मुख्य्मंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या भावाला पर्यटन मंत्री करण्यात आलं होतं. तसंच आणखी एका नातेवाईकाला पक्षात मोठं पद देण्यात आलं होतं. यावरुन पक्षात नाराजी सुरू आहे. पक्ष सत्तेत असताना ही नाराजी फारशी उघडपणे दाखवली जात नव्हती. आता मात्र ती उघडपणे व्यक्त केली जात आहे.
पक्षातले सुमारे 14 आमदार पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. पीडीपीमधून बाहेर पडून ते वेगळा पक्षा स्थापन करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या संभाव्य फूटीबाबत मेहबुबा मुफ्ती यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष फोडण्याचा दिल्लीतून प्रयत्न सरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. असं केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. पक्षातला वेगळा गट स्थापन झाल्यास भाजप त्या गटाला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र पक्षाचे नेते राम माधव यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. पीडीपी फुटीशी भाजपचा काहीही संबंध नसून आम्ही राज्यपाल राजवटीच्या बाजूने असल्याचं भाजपचं म्हणणं आहे.
COMMENTS