पुणे – राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं तर इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले होते. हे अर्ज पक्षाकडे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अनेक मतदारसंघात दोनपेक्षा अधिक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत संभ्रम आहे. परंतु तरीही अनेक इच्छुक नेत्यांनी पक्षाकडून उमेदवारी घोषीत होण्यापूर्वीच आपल्या मतदारसंघात जोरदार तयारी सुरु केली आहे.
दरम्यान पिंपरी मतदारसंघातून पाच इच्छुक नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, माजी आमदार अण्णा बनसोडे, नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत, नगरसेवक राजू बनसोडे, माजी नगरसेवक गोरक्ष लोखंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्याचबरोबर जवळपास सर्वांनीच आपल्या मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. शेखर ओव्हाळ यांनी तर एक वर्षापासूनच निवडणुकीची तयारी केली असून आता त्यांनी नागरीकांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. पक्ष आपल्यालाच उमेदवारी देणार असा त्यांना विश्वास आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
COMMENTS