पिंपरी चिंचवड – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. ऐनवेळी राष्ट्रवादीनं माघार घेतल्यामुळे भाजपच्या गळ्यात उपमहापौरपदाची माळ पडली आहे. सत्ताधारी भाजप नेत्यांच्या मनधरणीनंतर राष्ट्रवादीच्या उमेदवार निकिता कदम यांनी ऐनवेळी माघार घेतली. निकिता कदम यांनी माघार घेतल्यामुळे उपमहापौरपदी भाजपचे नगरसेवक केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. केशव घोळवे यांना उपमहापौरपदाची केवळ पाच महिन्यांसाठी संधी देण्यात आली आहे.
उपमहापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून नगरसेवक केशव घोळवे यांनी अर्ज दाखल केला. महापालिकेत भाजपची सत्ता असताना घोळवे यांची निवड निश्चित होती. मात्र, संख्याबळ नसताना राष्ट्रवादी काँग्रेसनं उपमहापौराच्या निवडणुकीत उडी घेतली. निकिता कदम यांनी अर्ज दाखल केला. मात्र, भाजपकडून निकिता कदम यांची मनधरणी करण्यात आली. कदम यांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
दरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी गेल्या महिन्यात तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. यावाळी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हे पीठासन अधिकारी होते. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध असल्याचं पीठासन अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. माघार घेण्यासाठी उभय उमेदवारांनी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला. भाजप उमेदवार केशव घोळवे व सभागृह नेते नामदेव ढाके यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार निकिता कदम यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना माघार घेण्यासाठी विनंती केली. अर्ज माघार घेण्यासाठी अवघे चार मिनिटं शिल्लक असताना कदम यांनी माघार घेतली. त्यानंतर केशव घोळवे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या या निवडीनंतर महापालिकेत समर्थकांची एकच गर्दी पहायला मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या
COMMENTS