नवी दिल्ली – ॲट्रॉसिटीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक बोलावली असून या बैठकीला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनाही चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या ७ लोककल्याण मार्ग येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून ॲट्रॉसिटीसंदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. अॅट्रॉसिटीत तत्काळ अटकेला मनाईच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात हे आंदोलन करण्यात आले होते. देशातील 14 राज्यांमध्ये या दलित आंदोलनाचा परिणाम जाणवला, तर अनेक ठिकाणी हिंसाचारही झाला. सर्वात जास्त हिंसाचार मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झाला होता. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही आंदोलकांचा हिंसाचारात मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली, ज्यात दुकानं आणि वाहनांचं मोठं नुकसान झालं. राजस्थानमध्ये काल मोठ्या जवामानं भाजपच्या दलित आमदाराचं घर जाळलं असल्याची घटना घडली. त्यामुळे देशभरात वातावरण तापलं असल्याचं पहावयास मिळालं आहे.
दरम्यान अॅट्रोसिटी संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी या हिंसाचारासाठी भाजपला जबाबदार धरलं होतं. त्यानंतर आज पंतप्रधान मोदी यांनी या हिंसक आंदोलनाची दखल घेत बैठक बोलावली असून याबाबत काय तोडगा काढला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS