पराभवानंतर राज्यातील हे दिग्गज नेते काय म्हणतात?, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना!

पराभवानंतर राज्यातील हे दिग्गज नेते काय म्हणतात?, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना!

मुंबई – विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. तर पहिल्यांदाच काही नेत्यांनी या निवडणुकीत विजय प्राप्त केला आहे. पराभूत झालेल्या नेत्यांनी आपला पराभव स्विकारत सोशल मीडियाद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. या पराभवानंतर त्यांनी ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी

आज हरलो आहे पण थांबलो नाही,
जिंकलो नाहीं पण संपलो ही नाही.

असं म्हटलं आहे.

लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखों जनतेचे तसेच दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. सदैव आपल्या सेवेशी तत्पर, अशी पोस्ट उदयनराजे भोसलेंनी ट्विटरवर शेअर केली आहे.

राम शिंदे – भाजप

शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी भाजप नेते राम शिंदे यांचा तब्बल 47 हजार मतांनी पराभव केला. पराभव झाल्यानंतर राम शिंदे यांनी आज फेसबूक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पराभव झाल्यानंतर ‘थांबणे मला मान्य नाही’, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.याबाबत राम शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे.

Posted by Ram Shinde on Friday, October 25, 2019

 

पंकजा मुंडे – भाजप

पंकजा मुंडे यांची व्हायरल पोस्ट

मी माझा पराभव मान्य केला असून मी लागलीच माध्यमातूनही त्याचा स्वीकार केला आहे ..
असं सर्व का झालं यावर मी चिंतन करेन लोकांना जाऊन भेटेन ही ..
आता या विषयाला सर्वांनी विराम द्यावा..कोणी कोणावर आरोप करू नये, जबाबदारी ढकलू नये, निवांत आपली दिवाळी कुटुंबा समवेत साजरी करावी…
राजकारणात सर्वेसर्वा असतात मतदार, त्यांचा निर्णय अंतिम असतो.. तो योग्य का अयोग्य यात चर्चा नसतेच ..तो अंतिम असतो बस्स!!…
ज्यांनी मतदान केलेलं असतं त्या लोकांसाठी तो निर्णय योग्यच असतो!!!
मी माझ्या प्रचाराच्या शेवटच्या सभेत स्पष्ट केलं होतं “मला मुक्त करा किंवा स्वतः मुक्त व्हा” ..
या राजकारणात मी यशस्वी होणं हा ही पराभव आहे असंही मला वाटत राहिलं….
19 ऑक्टोबरला 6 वाजता प्रचार संपला, नंतर मी घरी गेले ते सरळ मतदानासाठीच बाहेर पडले 21 तारखेला सकाळी ..
माझ्या निवडणुकीत ऐन महत्वाच्या दिवशीच मी घरी बसून राहिले ..गोपीनाथ गड येथे साहेबांचे दर्शन घेतले मध्ये आणि थेट मतदानाच्या सकाळीच बाहेर पडले ..
मला मतं मिळाली नसतीलही ,मला मन जिंकताही आली नसतील पण एक मात्र नक्की आहे ,’असत्य मला वागता आलं नाही’हे शत्रूही कबूल करेल.
या पोस्ट च्या खाली येणारे ट्रोल विरोधक जाहीरपणे नाही पण एकांतात मान्यच करतील ‘ताईना खोटं नाही जमलं…’
विश्वास ठेवा मी ‘त्या ‘क्लीप मधील वाक्याने जी घायाळ झाले ते उठलेच नाही.
मी सर्व प्रहार आणि संघर्ष भोगले पण हा वार जिव्हारी लागला आणि ते जर बनावट असतं तर मी काही प्रभावित नसते झाले हे ही नक्की ..इतकी मी प्रगल्भ नक्कीच आहे हो ..
मंचावर त्या दिवशी मी खूप सावरलं स्वतःला,
मीडिया ही गेला होता.. मी काही प्रवेश ही घेतले पण गाडीच्या दिशेने जाताना कोसळले, त्याबद्दल जरा अवघड वाटत आहे ..
त्याचा अर्थ घेणारे घेतीलच पण जमलं तर विश्वास ठेवा ..माझ्या स्वाभिमानी स्वभावाला खूप लागलं, माझं कोलमडून पडणं अगदी निवडणूक हरल्या पेक्षाही लागलं .
मी आजवर राजकीय जीवनात जे केलं ते लोकांसाठी त्या सर्व भावना आणि स्व.मुंडे साहेबांची शपथ घेऊन सांगते मी शांत आहे आणि मुक्त झाली आहे .. निकालाची जवाबदारी फक्त माझी आहे !
हा पराभव ‘ पंकजा गोपीनाथ मुंडेंचा ‘ आहे कारण तो हवा होता अनेकांना म्हणूनच झाला असावा..
खूप काही जिल्ह्यासाठी स्वप्न होती ती राहिली सल एवढीच आहे ..
फक्त साऱ्यांना वेठीला धरून राजकारण बंद व्हावं ..कोणीतरी शाश्वत विकासावर बोलावं आणि तो करावा ..
नाहीतर उद्या लोक म्हणतील “ताई फोन उचलत नव्हत्या, भेटत नव्हत्या अशी चर्चा ऐकली होती, पण न फोन करता विकास दारात येत होता हे विचारात घेतलंच नाही.”
विकास निरपेक्ष आणि शाश्वत असावा ही इच्छा कोणीही पूर्ण करावी, त्यांना माझ्या शुभेच्छा ..
चला मग रजा घेते,सामाजिक कर्तव्यातून नाही पण पराभूत लोकप्रतिनिधी म्हणून …
पत्ता कळवते ..माझ्या घराचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतील ..काळजी घ्या स्वतःची आणि माझ्या जिल्ह्यातील विकासाची ..

#पंकजा_गोपीनाथ_मुंडे२५/१०/२०१९ मी माझा पराभव मान्य केला असून मी लागलीच माध्यमातूनही त्याचा स्वीकार केला आहे ..असं…

Posted by Pankaja Munde Live on Friday, October 25, 2019

शशिकांत शिंदे – राष्ट्रवादी

राष्ट्रवादीचा गड मानला जाणाऱ्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गड आला पण सिंह गेला.. अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या महेश शिंदेंना जवळपास 9 हजार मतांनी विजय मिळाला आहे. आपल्या पराभवानंतर शशिकांत शिंदेंनी ट्विटर अकाऊंटवरुन भावनिक पोस्ट केली आहे.

हरलो असलो तरी लढणं सोडलं नाही, जिंकण्यासाठी कधी तत्व मोडलं नाही. सत्तेसाठी कधी लाचार झालो नाही, असे म्हणत आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेल्या जनतेचं शिंदेंनी आभार मानलंय. तसेच सत्तेसाठी लाचारी पत्करली नाही, असं म्हणत त्यांनी पक्षबदलू नेत्यांना टोलाही लगावला. शिंदेंची ही पोस्ट फेसबुक आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे.

रमेश आडसकर – भाजप

माजलगाव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार
रमेश आडसकर यांचा पराभव झाला. त्यानंतर आडसकर यांनी आज विधानसभेचा निकाल लागला. माजलगाव मतदारसंघातील सर्व मतदारांनी ज्या पध्दतीने मतदान करून मला जो पाठिंबा दर्शविला जी साथ दिली त्याबद्दल प्रथमतः मी सर्व महायुतीचे नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांचे मनापासुन आभार मानतो आणि जे लोक माझ्याबरोबर
राहिले त्यांच्यासाठी येणाऱ्या पुढील काळात मी कायम सोबत राहील, आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने दिलेला कौल मान्य करून विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतो.मी पुढील काळात जनतेचा सेवक म्हणून काम करेल व मी माजलगाव येथे कायम राहणार आहे असं फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=142502120480111&id=100041609714582

COMMENTS