अहमदाबाद – गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. परंतु काँग्रेस आणि भाजपमध्ये अजूनही पोस्टर वार सुरु आहे. एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. यावरुन गजरातमधील राजकीय वातावरण आणखी तापत असल्याचं दिसून येत आहे. राहुल गांधींविरोधात अहमदाबादमध्ये भाजपचं पोस्टर झळकत आहे. या पोस्टरमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दहशतवादी अफझल गुरुचे समर्थक काँग्रेसचे कथित नेते सलमान निजामी यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. ‘अफजल का जो यार है, वो देश का गद्दार है,’ असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी निजामी यांचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केली होती. त्यानंतर हे पोस्टर लावण्यात आलं असून या पोस्टरवर मात्र भाजपचा उल्लेख दिसत नाही. त्यामुळे हे पोस्टर लावलं कोणी यावर चर्चा सुरु आहे.
अहमदाबादमध्ये एका बस स्थानकावर हे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये गुजरातमध्ये काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या निजामी यांचा राहुल गांधींसोबतचा फोटो आहे. यासोबतच निजामी यांचे वादग्रस्त ट्विटदेखील पोस्टरवर छापण्यात आले आहे. ‘तुम कितने अफजल मारोगे, हर घऱ से अफजल निकलेगा,’ असे ट्विट या पोस्टरवर दाखवण्यात आले आहे.‘अफजल का जो यार है, वो देश का गद्दार है,’ असा मजकूर या पोस्टरवर आहे.निजामी काँग्रेससाठी प्रचार करत असल्याचा स्पष्ट उल्लेख या पोस्टरवर आहे. या पोस्टरवर निवेदक म्हणून सरदार पटेल एकता संघ या संघटनेचे नाव आहे. शनिवारी लुनावाडामध्ये सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलमान निजामी यांच्या विधानावरुन काँग्रेसवर तोफ डागली होती.
मोदींच्या टिकेनंतर पंतप्रधानांनी आपल्या बोगस ट्विटचा उल्लेख केला असल्याचं निजामी यांनी म्हटलं आहे. ‘मी गुजरातमध्ये काँग्रेसचा प्रचार करत आहे. मात्र मोदींनी ज्या विधानाबद्दल भाष्य केले, ते बोगस आणि खोटे आहे. मी पोलिसांकडे त्याबद्दलची तक्रारदेखील केली असल्याचं निजामी यांनी म्हटलं आहे.
COMMENTS