मुंबई – कोरोना काळात वाढीव वीजबिल आल्यामुळे विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या मुद्द्यावरून सभागृहात आज गोंधळ उडाला. विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब केला. यासोबतच वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्याची मागणी केली. सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्देशाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या विधीमंडळातील निर्देशानंतर संबंधीत यंत्रणांना वीजतोडणी तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आले आहे.
विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत थकबाकीसंदर्भात उपस्थित मुद्याला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वीजबिलांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. चर्चा होऊन दोन्ही बाजूंच्या सभासदांचे समाधान होईपर्यंत राज्यातील कृषीपंप आणि ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात येणार नाही. राज्यातील वीजथकबाकीसंदर्भात विशेष बैठक आयोजित करुन चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
COMMENTS