मुंबई – पोलीस दल किंवा आएएस, आयपीएस झालेल्या व्यक्तींनी राजकारणात नवी इनिंग सुरू केल्याची आपल्याकडे मोठी उदाहरणे आहेत. आता त्यामध्ये आणखी एका नावाची भर पडण्याची शक्यता आहे. एकेकाळी गुंडांचा कर्दनकाळ ठरलेले एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा लवकरच आपल्या नव्या राजकीय इंनिंगची सुरूवात करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रदीप शर्मा यांच्या पी.एस. फाऊंडेनतर्फे अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी परिसरात महिलांसाठी रक्षाबंधनानिमित्त रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला या मतदारसंघातील आणि भागातील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
प्रदीप शर्मांच्या या पी. एस. फाऊंडेशनतर्फे दर वर्षी या रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. याही वर्षी तसाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मात्र उपस्थित महिलांची संख्या खूप मोठी होती. या कार्यक्रमाला सुमारे 10 हजार महिला उपस्थित असल्याचा दावा केला जातोय. या माध्यमातून प्रदीप शर्मा यांनी अंधेरी पूर्व मतदारसंघातून विधानसभेची तयारी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीही तशी चर्चा या भागात सुरु होती. मात्र यंदाच्या रक्षाबंधनच्या कार्यक्रमाताली भव्यता दिव्यता पाहून आणि महिलांची संख्या पाहून विधानसभेसाठी प्रदीप शर्मा यांनी शड्डू ठोकल्याची चर्चा या भागात सुरू झाली आहे.
प्रदीप शर्मा सध्या पोलीस सेवेत आहेत. मात्र निवडणुकीच्या आधीच त्यांची निवृत्त होणार आहे. समजा काही दिवस राहिले तर पोलीस सेवेतील पदाचा राजीनामा देऊन ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे. पी. एस. फाऊंडेशनच्या माध्यमातून शर्मा या भागातील नागरिकांच्या संपर्कात असतात. त्यामुळे या भागात त्यांचा चांगला संपर्क आहे. भाजपकडून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशीही शक्यता आहे. मात्र कोणत्याच पक्षातून उभे नाही राहिले तर ते अपक्ष म्हणूनही नशीब अजमावतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. अर्थात प्रदीप शर्मा यांच्याकडून अजून याबाबत अजून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही.
COMMENTS