औरंगाबाद – भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर जोरदारी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय स्वच्छ कारभार करतात त्यांनी कधीही पैसे खाल्लेले नाही असे भाजपाचे नेते सांगतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः खात नाहीत हे खरं आहे ते दुसऱ्याला खाऊ घालतात आणि त्यात वाटा मागतात असा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये बहुजन वंचित आघाडीची सभा आज पार पडली. यादरम्यान ते बोलत होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशभक्ती देशोधडीला लावणारी असल्याची जोरदार टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या कारभारात देश बुडवण्याचे धोरण आहे. मॉब लिन्चिंगचे प्रकार देशात चालले आहेत. ते अत्यंत चुकीचे असून, गोमांस घेऊन जातोय असा आरोप करत निष्पापांचे बळी घेतले जात आहेत. हे प्रकार घडू नयेत म्हणून ओबीसी समाजाने दक्ष राहिलं पाहिजे असंही यावेळी आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
तसेच रिलायन्सची दिवाळखोरी संपवण्यासाठी पेट्रोलचे दर १०० रुपयांपर्यंत पोहचू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत तर मग पाकिस्तानमध्ये पेट्रोल ३५ रुपये लिटर आणि श्रीलंकेत पेट्रोल २८ रुपये लिटरने कसं मिळतं? आंतरराष्ट्रीय बाजारातून सरकार कोणत्या दराने कच्चं तेल खरेदी केलं जात याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे.
तसेच भाजपाने देशाचा मालक असल्यासारखे वागू नये. उद्योजकांची कर्जे तुम्ही माफ करता आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम हे सरकार करतं आहे. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरले होते हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांना सालगड्यासारखं वागवण्याचा असल्याची जोरदारी टीकाही यावेळी आंबेडकर यांनी केली आहे.
COMMENTS