मुंबई – भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी उद्या महाराष्ट्र बंदची हाक भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली असून संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विजयस्तंभावर अभिवादन करणाऱ्या अनुयायांचा आणि हिंसाचार करणाऱ्यांचा एकमेकांशी संबंध नव्हता. मात्र आंबेडकरी अनुयायांना यामध्ये लक्ष्य करण्यात आले. तसेच पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. हिंदुत्त्ववादी संघटनांनी केलेल्या या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी शांततापूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच हिंसाचार पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हिंदुत्त्ववादी संघटनांना कोरेगाव ते शिरुर आणि कोरेगाव ते चाकण या पट्ट्यातील गावांनी मदत केल्याचा आरोपही त्यांनी त्यावेळी केला. तसेच या गावांचे अनुदान पुढील दोन वर्षांसाठी बंद करावे अशीही मागणी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. इमारतींच्या छतावरून दगडफेक करण्यात आली असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. आज राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या आहेत. तसेच उद्याच्या बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन आंबेडकर यांनी केले असून या घटनेचं कोणतेही राजकारण करु नये असंही ते म्हणाले आहेत.
COMMENTS