तर एकाही ओबीसी मंत्र्याला राज्यात फिरु देणार नाही, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा, 3 नोव्हेंबरला राज्यव्यापी आंदोलन !

तर एकाही ओबीसी मंत्र्याला राज्यात फिरु देणार नाही, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा, 3 नोव्हेंबरला राज्यव्यापी आंदोलन !

मुंबई – आमच्या ओबीसी मंत्र्यांचा आवाज मुख्यमंत्री आणि सरकारपर्यंत पोहोचत नाही. जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला किंवा तशी पावले उचलली तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नसल्याचा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सरकारला दिला आहे. प्रकाश शेंडगे यांनी मराठा आरक्षण तसंच नोकरभरती संदर्भात पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी मराठा नेते आणि संघटनांवर त्यांनी जोरदार टीका केली आहे.

मराठा नेते ओबीसी समाजाच्या आरक्षणाची मागणी करत आहेत.मात्र आता त्यांचे आरक्षण मिळणार नाही हे लक्षात आल्याने ते ओबीसीचे आरक्षण मागत आहेत. असा कोणताही प्रस्ताव सरकारने पारित करू नये.तसे झाले तर ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती यांचा राज्यात उद्रेक होईल. आज ७२ हजार नोकऱ्यांची मेगा भरती थांबली आहे.

अनेक जण वाट पाहत आहेत, अनेकांचे वय संपल्याने त्यांचे आयुष्य अडचणीत येईल. त्यामुळे १३ टक्के जागा वेगळ्या ठेवून इतर जागा भराव्यात. अशी मागणी शेंडगे यांनी केली आहे. आज लाखो विद्यार्थ्यांना प्रवेश थांबल्याने त्यांची अडचण झाली आहे.केवळ मराठा समाजासाठी होत असेल तर आम्ही एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असंही शेंडगे यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजातील काही संघटना, नेतेमंडळी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी मागणी करत आहेत. अशी मागणी करुन हे नेते महाराष्ट्रातलं सामाजिक सलोख्याचं वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत. ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटवण्याचं षडयंत्र सुरू आहे. मराठा आरक्षणाचं राजकारण होतंय. ओबीसी समाजाचं ताट खेचण्याचा प्रयत्न होतोय. ओबीसी आरक्षण बचावासाठी 3 तारखेला राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचं शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

 

COMMENTS