मुंबई – विधानसभेसाठी शिवसेना-भाजप युती अभेद्य आहे. पण युती तुटली तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याचे संकेत भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी दिले आहेत. नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच असेल, असे संकेतही लाड यांनी दिले आहेत. लाड यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आगामी काळात शिवसेना-भाजप स्वतंत्र लढू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान गेली काही दिवसांपासून शिवसेना -भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन आणि जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. तसेच या दोन्ही पक्षांकडून स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी देखील सुरु असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात तशी बोलणीही झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा जागावाटपाच्या मुद्द्यावरून ऐनवेळी युती तुटते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तसेच काही दिवसांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील १३५ जागांवर समाधान मानणे भाजपसाठी अशक्य असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्री व अमित शहा यांच्याशिवाय कोणालाही गृहीत धरत नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात युती होणार की नाही हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS