मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या काही सहकाय्रांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे खाजगी सचिव डॉ. प्रशांत भामरे यांच्यावरही उपचार सुरु आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांना एका खोलीत क्वारंटाईन केले जाते. त्यामुळे हा एकांतवास कसा घालवायचा असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकजण घाबरून जातात परंतु कोरोनावर उपचार घेतांनाचा एकांतवास कसा घालवायचा आणि कोरोनावर कशी मात करायची याबाबतची पोस्ट भामरे यांनी केली आहे.
खाजगी सचिव डॉ. प्रशांत भामरेंची फेसबुक पोस्ट
पॅपिलॉन, सॉलिटरी कनफाईनमेन्ट आणि मी.
खुप पुर्वी म्हणजे सुमारे 24-25 वर्षापुर्वी कॉलेजला असताना हेन्री शरियर ची पॅपिलॉन वाचली होती. त्यातला नायक पॅपिलॉन हा 18-19 वर्षांचा फ्रेंच तरुण, त्याला तो निर्दोष असतानाही एका गुन्ह्यात न्यायव्यवस्था दोषी ठरऊन जन्मठेपेची शिक्षा सुनावते. मग तत्कालीन व्यवस्थेनुसार ( अत्यंत अमानवीय आणि बदनाम फ्रेंच पिनल सिस्टिम ) त्याला लॅटिन अमेरिकेतील फ्रेंच गियाना या वसाहतीच्या डेविल्स आयलंड वर नेलं जात. फ्रांसपासुन हजारो मैल दुर असलेल्या या ठिकाणी तो सतत एकाच विचारात आणि प्रयत्नात असतो तो म्हणजे तुरुंगातून पळ काढुन फ्रांस ला परत जाणे.
यासाठी तो सात प्रयत्न करतो, पहिल्या प्रयत्नात वेस्टइंडीज बेटांपर्यंत जाण्यात यशस्वीसुद्धा होतो, परत पकडला जातो आणि परत फ्रेंच गियानात आणला जातो. परत काही काळाने तो दुसरा प्रयत्न करतो. असं तो सतत करत राहतो आणि शेवटी सातव्या प्रयत्नांत यशस्वी होतो. एकदा तर तो पळुन जातो गौजिरा नावाच्या कोलंबियाच्या प्रांतात जातो तिथे समुद्रकाठी असलेल्या एका कोळ्यांच्या स्वर्गसमान वस्तीत जातो तिथे दोन मुलींशी लग्न करतो, वर्ष दोन वर्ष राहतो, परत आपला बदल पुर्ण करणेसाठी तिथुन निघतो ते परत पकडला जातो आणि त्याला परत फ्रेंच गियानात आणतात. असे हे कथानक 1931 ते 1945 अश्या 14 वर्षात घडते. शेवटी तो 7 व्या प्रयत्नांती यशस्वी होतो त्याचा बदला पुर्ण करतो आणि व्हेनेझुएलात सेटल होतो. अशी अत्यंत भन्नाट आणि इन्स्पायरिंग कादंबरी आहे. त्यावर चित्रपटही निघाला होता पण कादंबरीच्या पायाच्या नखाचीसुद्धा त्याला सर नव्हती. सांगायचं मुद्दा असा आहे कि या कादंबरीत या पॅपिलॉनला एकदा पळुन गेल्यावर परत पकडुन आणतात आणि त्याची शिक्षा म्हणुन त्याला 8 वर्षाची सॉलिटरी कानफाइनमेंटची शिक्षा सुनावली जाते. हि शिक्षा म्हणजे फार भयानक प्रकरण असते, यात एका इमारतीत आठ बाय सहा चे सेल केलेले असतात, त्यात कैद्याला ठेवलं जात.
एकदा त्याला आत घातलं कि शिक्षा संपेपर्यंत त्याला बाहेर काढलं जात नाही. कोठडीतून कोणीही दिसत नाही कोणाशी बोलणं होत नाही. दर दिवशी एकदा दरवाजाला असलेलं एक छोटं खिडकी उघडली जाते त्यातून कैद्याला एक पाणी आणि जेवणाची बदली आणि मलमूत्रासाठी एक रिकामी बदली दिली जाते. अश्या परिस्थितीत कैदी वेडाने मरतात. पॅपिलॉन ला जेव्हा 8 वर्षांसाठी हि शिक्षा सुनावली जाते तेव्हा त्याच्यासोबतच एक वयोवृद्ध कैदी त्याला सांगतो कि त्या नरकातून 8 वर्षानंतर जिवंत बाहेर येणे अशक्य आहे, आतापर्यंत जास्तीतजास्त दोन वर्षाचा रोकॉर्ड आहे, त्यामुळे तु आता तुज बघ कस करायचं ते. पॅपिलॉन ला लक्षात येत कि आठ वर्ष एकांतवासात राहुन शारीरिक आणि मानसिकरीत्या सक्षम राहायचं असेल तर काहीतरी क्लुप्ती लढवावी लागेल. मग तो आत गेल्यावर एक शक्कल लढवतो. आठ फूट लांब असलेल्या त्या सेल मध्ये तो चालायला सुरवात करतो, चालताना पावले मोजतो.
दरवाज्यापासुन भिंतीपर्यंत, वन, टू, थ्री, फोर…..ऐट अबाऊट टर्न, परत वन, टू, थ्री, फोर…..ऐट. असं तो दमेपर्यंत करतो, दमला कि झोपतो उठला कि परत वन, टू, थ्री, फोर…..ऐट. आणि ही शक्कल काम करते तो आठ वर्षेनंतरही तितक्याच भक्कमपणे त्या भयानक एकान्तवासातून बाहेर येतो. सध्या बाँम्बे हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यावर बारा बाय पंधराच्या कक्षात दररोज सकाळी मॉर्निग वॉक कसा करावा हा प्रश्न होता, तेव्हा पॅपिलॉनची आठवण झाली आणि माझ्या कक्षातील दरवाजापासून ते भिंतीपर्यंत सुरु केलं एक, दोन तीन चार पाच सहा ….. नऊ, अबाऊट टर्न …. आणि चक्क सहा किलोमीटर चा वॉक पूर्ण केला अगदी फ्रेश वाटलं. थँक यु पॅपिलॉन, थँक यु हेन्री शरियर सर !!!!
https://m.facebook.com/story.php?story_fbid=275383647147291&id=100040269725362
COMMENTS