मुंबई – कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे राज्यातही मंत्रालयासह सर्व कंपन्या उद्योगधंदे बंद आहेत. पूर्वी काही ना काही कामानिमित्त मुंबईसह मंत्रालय गजबजलेलं असायचं. परंतु लॉकडाऊनमुळे याठिकाणची मोठी गर्दी कमी झाली आहे. दररोज 30 हजार लोकांची गर्दी असलेल्या मंत्रालयात सध्या फक्त शे-दोनशे लोक पहायला मिळतायत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी हे 70 दिवसांनंतर मंत्रालयात गेले होते. या मंत्रालयातील सद्यस्थितीबाबत जोशी यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. मंत्रालय तेंव्हाचं आणि आजचं कसं आहे याबाबतचा अनुभव त्यांनी आपल्या शब्दात मांडला आहे.
प्रशांत जोशी यांची फेसबुक पोस्ट
निराशा और आशा
मंत्रालयातून
आईचे निधन आणि लॉकडाउन यामुळे तब्बल 70 दिवसाच्या कालावधीनंतर मी बुधवारी मंत्रालयात गेलो. बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे 3 दिवस काम केले. मंत्रालय म्हटले की तुफान गर्दी,अक्षरश: माणसांचा वाहणारा महापूर म्हटलं तरी चालेल.मार्च एण्ड व एप्रिल मे महिना तसा तर मंत्रालय साठीचा सुगीचा कालावधी ! परंतु मागच्या तीन दिवसात मे महिना असूनही मंत्रालयातील भयाण शांतता पाहून मन खिन्न झाले.
गेटवर असलेले केवळ एक दोन पोलीस वगळता कोणतीही गर्दी नव्हती.मंत्रालयातील परिसरात बंद पडलेल्या गाड्या व एक प्रकारची वातावरणातील शांतता खूपच क्लेशदायक होती.
ज्या मंत्रालयाने वीस -पंचवीस -तीस हजारांची गर्दी पाहिली,त्या मंत्रालयात या 3 दिवसात अनेक मंत्री असतानाही केवळ शे 200 लोक होते. इतर वेळी मंत्र्यांच्या मागेपुढे फिरणारे दोनशे तीनशे लोक कुठे?आणि आज त्यांच्यासोबत असणारे दोन लोक कुठे?
मला आठवते 2010 ला प्रथम मी साहेब आमदार झाले त्यावेळी प्रथम मंत्रालय पाहिले. सहाव्या मजल्यावर मंत्रिमंडळ बैठकीसाठी आलेल्या मंत्र्यांना पाहायला गेलो होतो.संपूर्ण सहावा व 7 वा मजला गर्दीने फुल भरून गेला होता.
काल त्याच मजल्यावर पाहिलेली भयाण शांतता मला मंत्रालयावरील अवकळेची जाणीव करून देत होती.लोकांनी उड्या मारून आत्महत्या करू नये म्हणून लावलेली जाळी जणू वाकुल्या दाखवत होती. दोन दिवसापूर्वी मंत्रालयातील दीड हजार कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या पोलीस विभागात केलेल्या बदल्या,त्यामुळे आधीच भयग्रस्त असणाऱ्या वरिष्ठ मंत्र्यांलयीन अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील खिन्नता स्पष्ट जाणवत होती.
सहज दोन-तीन मजल्यावर चक्कर मारून आलो परंतु ओळखीचे कोणी भेटलेच नाही. कामाच्या पाठपुराव्यासाठी पूर्वी जेव्हा मी माझी जागा सोडून मंत्रालयात भटकत असे तेव्हा प्रत्येक मिनिटाला कुणी ना कुणी भेटत.खूप वेळ जात होता.परंतु कालची शांतता पाहून मन खिन्न झाले.कोणी कोणाबरोबर जेवत नाही.चहा पीत नाही.दुसऱ्याने दिलेले पाणी प्यायला मन घाबरते. एकत्र बसणे नाही. गप्पा मारणे नाही.नुसतीच शांतता !!नाही म्हणायला चुकून जर कोणी भेटले तर तीर्थप्रसादाप्रमाणे एकमेकांना हात स्वच्छ करण्यासाठी हँडवॉश अथवा सनीटायझर मात्र देत होते.
प्रत्येकाने तोंडाला जनावराला बांधतात तसे मुसके मात्र बांधले होते. जवळून गेले तरी कोणी ओळखू येत नव्हते एवढ्या उदासीनतेतही त्यांच्या मास्क वर नाव असावे असे वाटून गेले. सरकारने सांगितल्याप्रमाणे आता या रोगासोबत जगायला हवे.परंतु असे असताना मला गरज असताना खरंच मला वैद्यकीय मदत मिळेल काय याची मात्र धास्ती अनेकांच्या बोलण्यात जाणवली.
एकीकडे हे सर्व मनाला निराशा आणणारे चित्र, आणि दुसरीकडे एक आशादायी चित्र दिसले. लोकल बंद असल्या तरी नेमून दिलेल्या 5-10 % ड्युटया प्रामाणिकपणे येऊन काम करणारे कर्मचारी दिसले, पूर्वी 50 माणसे जे काम करायचे ते आता विभागाचे 4 माणसे जीव तोडून करत आहेत.
2 मंत्री यांना लागण झाल्याचे उघड झाल्यावरही अजितदादा सारखे जेष्ठ मंत्री सकाळी 7.30 पासून मंत्रालयात येऊन बसत आहेत, सायंकाळी 6 पर्यंत ते झपाटयाने काम करतात. Cm साहेबांचा बैठका, आढावा , निर्णयाचा धडाका सुरुच दिसतो. अनिल देशमुख, राजेश टोपे असतील, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, अनिल परब असतील, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मंत्री कार्यालयात स्टाफ नसला तरी प्रचंड काम करताना दिसत आहेत. मुंबई बाहेर असणारे माझ्या साहेबांसारखे ( धनंजय मुंडे ) अनेक मंत्री स्व:जिल्हा सांभाळून दर आठवड्याला मंत्रालयात येऊन कामे उरकत आहेत. नवख्या राज्यमंत्री आदिती तटकरे ही मंत्रालयात दिसतात त्यावेळी आपण योग्य लोकप्रतिनिधी निवडल्याची खात्री पटते. या कोणाच्याच चेहऱ्यावर भीती दिसत नाही तर दिसते काळजी आणि ती काळजी असते करोनाला घालवण्यासाठी , निर्धार दिसतो महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढण्याचा…. म्हणूनच मुंबईला जातांना वाटणारी भीती आणि पहिल्या दिवशीचे चित्र निराशेमधून आशेकडे घेऊन जाणारे वाटले….
जाता_जाता….
मुंबईत मी राहतो त्या खोलीचा दरवाजा 70 दिवसांनी उघडला. आणि अंगावर पक्षांची फडफड आली. बाथरूम च्या खिडकीचा एक काच निघाल्याने पक्षांनी आत येऊन घर केल्याचे आणि लहान लेकरांसारखा खोलीभर त्यांचा पसारा केल्याचे लक्षात आले. एका लहान कबुतराचा जन्म ही झाला होता, कदाचित ते ही होम कोरंटाईन झाले असावेत, म्हणूनच परत निघतांना तो काच न लावता तसाच परतलो. त्यांनीही घरीच थांबावे म्हणून….
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3271461266197322&id=100000004418337
COMMENTS