उस्मानाबाद – अभिष्ठचिंतनाच्या माध्यमातून शिवसेना आमदारांच्या बंधूनी खासदारकीच्या आखाड्यात दंड थोपाटले आहेत. परभणीचे शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांचे बंधू डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्ठचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. शहरातील छायादिप मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला जिल्ह्याच्या विविध भागातून कार्यकर्ते आले होते. अभिष्ठचिंतनाचे निमित्त असले तरी त्यांनी आगामी लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे.
हजारोच्या संखेने कार्यकर्ते या सोहळ्याला हजर झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये विविध पक्षातील कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी जमले होते. ज्या कार्यकर्त्यांना इतर कोणत्याही पक्षात स्थान मिळाले नाही, असे नवखे कार्यकर्ते यामध्ये मोठ्या संखेने उपस्थित होते. गेल्या वर्षभरापासून डॉ. पाटील यांनी ग्रामीण भागातील संपर्क वाढविला आहे. लग्नसोहळा, वाढदिवस, हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून गावागावातील कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे अभिष्ठचिंतन सोहळ्याला मोठ्या संखेने कार्यकर्ते जमले. कार्यकर्त्यांची मोठी फौज पाठीशी असल्याचे दाखवून दिले आहे.
असे असले तरी पाटील कोणत्या पक्षाकडून लढणार हे अजूनही अनिश्चित आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी झाली तर ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाईल. त्यामुळे या जागेवर पहिला हक्क डॉ. पद्मसिंह पाटील यांचा असणार आहे. मात्र वयोमानामुळे ते लढणार की नाही हे अजून निश्तित नाही. समजा ते लढलेच नाहीत तर त्यांच्या सून आणि विद्यमान जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांचा नंबर लागू शकतो. मात्र त्यांचे पती राणा जगजितसिंह पाटील हे विद्यमान आमदार आहेत. तसंच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे पुन्हा घराणेशाहीचा प्रश्न येऊ शकतो. जर पाटील घराण्याबाहेर तिकीट द्याचे झाले तर डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा राष्ट्रवादीकडून विचार होऊ शकतो. मात्र त्याला डॉ. पद्मसिंह पाटील यांचे आशिर्वाद असणे गरजेचे आहे.
शिवसेना भाजप वेगळे लढल्यानंतर भाजपकडूनही त्यांचा नंबर लागू शकतो. मात्र डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे बंधू राहुल पाटील हे परभणीचे शिवसेनेचे आमदार आहेत. तसंच ते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जवळचे समजेल जातात. त्यामुळे मग प्रतापसिंह पाटील हे शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवणार का असाही प्रश्न आहे. मग राहता राहिला शिवसेनचा उमेदवार म्हणून ते रिंगणात उतरु शकतात. मात्र शिवेनेला विद्यामान खासदारांना तिकीट नाकारून पाटील यांना तिकीट देणार का ? जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते त्यांना स्विकारणार का ? राहुल पाटील यांची आदित्य ठाकरे यांच्याशी असलेली जवळीक डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या कामी येणार का ? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. एकूणच सध्याची स्थिती पाहता डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी लोकसभेची जोरदार तयारी केली. मात्र पक्ष अजून अनिश्तित आहे.
COMMENTS