मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज आझाद मैदान येथे पार पडलेल्या शेतकरी मोर्चावर टीका केली आहे. भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी? या आंदोलनात शेतकरी कमी इतर लोकच जास्त घुसवली आहेत, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
कृषी कायद्याविरोधात आझाद मैदानात आज शेतकऱ्यांचा विराट मोर्चा पार पडला. या मोर्चाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते. मात्र, या मोर्चावरून प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. या आंदोलनात लोकं घुसवली आहेत. इथली लोकं शेतकरी म्हणून आंदोलनात घुसली. भेंडीबाजारात कुठून आलेत शेतकरी? असा सवाल दरेकर यांनी केला. आंदोलनाला प्रतिसाद मिळत नसल्यानेच अशा प्रकारची गर्दी गोळा करण्याची आघाडीवर वेळ आली आहे.
या आंदोलनात शिवसेनेचा एकही नेता सहभागी झाला नाही. त्यावरूनही दरेकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. आजच्या आंदोलनाने शिवसेनेला भूमिकाच नाही हे स्पष्ट झालं आहे. आता रोखठोक भूमिका घेणारी शिवसेना उरली नाही, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना मोर्चात येऊ नको म्हणून सांगितलं. पवारांचा हा सल्ला समजायला वेळ आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीच सोडा पण शिवसेनेचा एकही नेता या आंदोलनाकडे फिरकला नाही, असंही ते म्हणाले. केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे. पण काही राजकीय पक्ष त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना पुढे करत आहेत, असा टोलाही त्यांनी केला.
COMMENTS