नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला असून लाभाचे पद स्वीकारणाऱ्या आपच्या वीस आमदारांचे सदस्यत्त्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रद्द केले आहे. त्यामुळे दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारसाठी हा सर्वात मोठा झटका मानला जात आहे. निवडणूक आयोगाने कारवाई करत लाभाचे पद स्वीकारणाऱ्या या २० आमदारांना अपात्र ठरवण्याबाबतची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही शिफारस मान्य करत २० आमदारांना अपात्र ठरवले आहे.
शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भातली शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी ही शिफारस मान्य करण्यात आली असून राष्ट्रपतींच्या या निर्णयामुळे अरविंद केजरीवालांना हा सर्वात मोठा झटका बसला असल्याचं बोललं जात आहे. परंतु आपच्या आमदार अलका लांबा यांनी राष्ट्रपतीचा निर्णय संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये सरकारचा हस्तक्षेप स्पष्ट दिसत असून रविवार सुट्टीच्या दिवशी निर्णय का घेतला गेला असा सवाल त्यांनी केला असून निवडणूक आयागोने आम्हाला बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.
COMMENTS