डोळ्यांना विकास दिसत नसेल तर तुमच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करून देऊ – प्रीतम मुंडे

डोळ्यांना विकास दिसत नसेल तर तुमच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करून देऊ – प्रीतम मुंडे

बीड – मागील पाच वर्षात जिल्ह्यात काय विकास झाला हे जर विरोधकांना दिसत नसेल तर नक्कीच त्यांच्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला आहे. माणुसकीच्या नात्यातून आगामी महाआरोग्य शिबिरात त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन फुकटात करून देऊ असे प्रत्युत्तर प्रीतम मुंडे यांनी विरोधकांना दिले. यंदाच्या निवडणुकीतील बीड येथील पहिल्याच जाहीर सभेत प्रीतम मुंडेंनी जोरदार बॅटींग केली.

पुढील निवडणुकीचा फॉर्म भरायला आम्ही रेल्वेत बसूनच येऊ अशी घोषणा आपण कधीच केली नव्हती, तरी देखील आमच्या प्रयत्नांमुळे रेल्वे बीडच्या वेशीपर्यंत आल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात वेगाने होत असलेले राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा रस्ते, बीडचे पासपोर्ट ऑफिस, अत्याधुनिक शौचालय हे जर विरोधकांना दिसत नसेल तर त्यांच्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आगामी महाआरोग्य शिबिरात त्यांच्या डोळ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करून देऊ तसेच श्रवणयंत्रही मोफत देऊ असा टोला त्यांनी लगावला. सर्वात कमी खासदार फंड खर्च केल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना त्या म्हणाल्या २६ कोटींच्या कामांना प्रशासकीय कामांना मंजुरी मिळालेली असून साडेसातशे कामे पूर्णत्वास गेली आहेत. माहिती अधिकाराचा वापर धमक्या देण्यासाठी ऐवजी खरी माहिती घेण्यासाठी केला असता तर ही माहिती कळाली असती आणि खोटे आरोप करून तोंडघशी पडायची वेळ आली नसती असे त्यांनी टीकाकरांना सुनावले.

‘शेतकरीपुत्र’ म्हणवून घेतल्याने काळजी निर्माण होत नसते

जगमित्र नागा सूतगिरणीने मयत शेतकऱ्याच्या नावाने बोगस सह्या मारून जमीन स्वतःच्या नावे करून घेतली त्यावेळी माझ्या विरोधात उभ्या असलेल्या ‘शेतकरीपुत्रा’चा कळवळा कुठे गेला होता असा सवालही त्यांनी केला. भूसंपादन मावेजा, पीकविमा, अनुदान यासाठी मी संसदेत प्रश्न मांडले आहेत. केवळ स्वतःला ‘शेतकरीपुत्र’ म्हनुवून घेतल्याने त्यांच्याबद्दलची काळजी जाहीर होत नसते असा चिमटा त्यांनी काढला.

COMMENTS