काँग्रेसच्या सरचिटणीस पदावरुन हटवल्यानंतर प्रिया दत्त शिवसेनेच्या वाटेवर ?

काँग्रेसच्या सरचिटणीस पदावरुन हटवल्यानंतर प्रिया दत्त शिवसेनेच्या वाटेवर ?

मुंबई – काँग्रेसच्या सरचिटणीस पदावरुन हटवल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रिया दत्त या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षांतर्गत कारवाईनंतर प्रिया दत्त यांच्या आगामी राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता लागली आहे. प्रिया दत्त यांना शिवसेनेकडून उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याबाबत चाचपणी सुरु असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. परंतु याबाबत शिवसेना नेते आणि प्रिया दत्त यांनी थेट भाष्य करण्यास नकार दिला आहे.

दरम्यान प्रिया दत्त यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली असून मी काँग्रेस सोडणार नाही, काँग्रेस माझ्या रक्तात आहे. राजकीय विरोधकांकडून माझ्याबाबतीत अपप्रचार केला जात असून गेली 8 वर्षं मी काँग्रेसच्या सचिव पदावर होते. काही व्यक्तिगत कारणांमुळे पदमुक्त करण्याची विनंती यापूर्वीच मी पक्षश्रेष्ठींना केली होती असंही प्रिया दत्त यांनी म्हटलं आहे.तसेच आगामी लोकसभा निवडणूक लढवावी की नाही याबाबत अद्याप ठोस निर्णय घेतला नाही पण मला उमेदवारी द्यावी अथवा नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील. ते माझ्या हातात नाही असं स्पष्टीकरणही प्रिया दत्त यांनी दिलं आहे.

तसेच ठाकरे कुटुंबियांशी आमचे कौटुंबिक संबंध असून बाळासाहेबांचे आमच्यावर उपकार आहेत. परंतु जे मला व्यक्तिगत ओळखतात त्यांना माझी राजकीय भूमिका ठाऊक असल्याचंही प्रिया दत्त यांनी म्हटलं आहे.

COMMENTS