नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी श्रीगोंद्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांना निलंबित करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. महावीर जाधव यांच्या विरोधात आज विधानसभेत राष्ट्रवादीच्या आमदारांनी गदारोळ केला होता. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत विशेष हक्कभंग प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला काँग्रेस, शिवसेनेसह सर्वच पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे उपनिरीक्षक असलेले महावीर जाधव यांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे भुजबळांना शिवीगाळ करणं हे महावीर जाधव यांना चांगलच महागात पडलं असल्याचं दिसत आहे.
दरम्यान शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू, राजेश क्षीरसागर, भाजपाचे एकनाथ खडसे, आमदार बच्चू कडू यांसह अनेक आमदारांनी मुजोर अधिकाऱ्यांविरोधातील तक्रारीचा पाढाच वाचला. कोणत्याही आमदारांचा अपमान होत असेल तर तात्काळ निलंबित करण्याची मागणी यावेळी सुनील प्रभू यांनी केली.
विधानसभेत झालेल्या आजच्या गदारोळामुळे लोकप्रतिनिधी आणि पोलीस असे चित्र निर्माण झालं होतं. यावेळी पोलिसांविरोधात आवाज उठवत आमदारांनी निलंबित ऐवजी कार्यमुक्त करण्याची आग्रही मागणी केली होती.
तसेच शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी देखील पोलिसांनी आपल्यावर अन्याय केला असल्याचे आरोप केल्यामुळे एकंदरीतच सर्वच आमदारांनी पोलिसांविरोधात आवाज उठवला असल्याचं पहावयास मिळालं आहे.
COMMENTS