पुणे – आगामी लोकसभा निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे. या निवडणुकीसाठी विविध पक्षातील अनेक नेत्यांनी दंड थोपटले आहेत. काही झालं तरी निवडणूक आपणच जिंकणार असा आत्मविश्वास बाळगूण हे नेते आपल्या पक्षाकडे उमेदवारी मागत आहेत. राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. पुण्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघही आगामी निवडणुकीत चांगलाच गाजणार असल्याचं दिसत आहे. कारण या मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नेते आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी दंड थोपटले आहेत.
महेश लांडगे यांना पराभूत केल्याशिवाय शेंडीची गाठ बांधणार नाही असा निर्धार साने यांनी केला आहे. साने हे भोसरीतून उमेदवारी घेण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत.विशेष म्हणजे लांडगे हे राष्ट्रवादीत असताना त्यांना निवडून आणण्यात साने यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे ही निवडणूक आपणच जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच पक्षाने उमेदवारी दिली नाही तर लांडगेंना हरवण्यासाठी अनेक पर्याय असल्याचा इशाराही साने यांनी दिला आहे.
दरम्यान या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विलास लांडे हे देखील इच्छुक आहेत. विलास लांडे यांना लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे विधानसभेला आपल्याला नक्की उमेदवारी मिळणार असा विश्वास आहे. त्यामुळे लांडे यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा सामना पुन्हा एकदा भाचे असलेले महेश लांडगे यांच्यासोबत होऊ शकतो. परंतु दत्ताकाका साने यांनी उमेदवारीसाठी दावा केल्यामुळे आता उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीतील या दोन नेत्यांमध्ये चुरश सुरु झाली आहे. त्यामुळे पक्ष कोणाला उमेदवारी देणार हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS