पुणे – सिंहगड दंत महाविद्यालयात प्राध्यापक आणि कृत्रीम दंतशास्त्र विभागाचे प्रमुख असलेले डॉ. जयंत पळसकर हे दंतशास्त्रातील अमेरिकन व युरोपीयन पेटंट मिळवणारे पहिले भारतीय ठरले आहेत. डॉ. पळसकर यांनी सेंट्रीक जॉ रिलेशनमधील उपकरणाचा शोध लावला आहे. त्यामुळे पळसकर यांना अमेरिका
आणि युरोपियन समुदायाकडून दोन पेटंट मिळाले आहेत. अमेरिकन आणि युरोपियन समुदायाकडून पेटंट मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले असून पळसकर यांच्या या उपकरणाची भारत सरकारनं तातडीने दखल घेतली आहे. या उपकरणाच्या निर्मितीसाठी भारत सरकारनं 50 लाखांचे अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे लवकरच या उपकरणाचा उपयोग देशासह विदेशातील रुग्णांना होणार आहे.
दरम्यान सेंट्रीक जॉ रिलेशन घेण्याकरता सध्या कोणतही उपकरण नसल्यामुळे पळसकर यांनी लावलेल्या शोधाचा सर्व दंत चिकीत्सांना आणि सामान्य दंत रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. त्यांनी लावलेल्या शोधामुळे कृत्रिम दात, वेडेवाकडे असणारे दात यांची योग्यरितीने सांगड घालण्यासाठी या नवीन उपकरणाचा मोठा फायदा होणार आहे. वरच्या आणि खालच्या दातांची सांगड योग्य रितीने न झाल्यास होणारे दुष्परिणाम जसे की डोके दुखी, जबड्याखालील वेदना यावर मात करण्यासाठी हे उपकरण प्रभावी ठरणार आहे. तसेच याच्या वापरामुळे दंत रुग्णांना वारंवार दंत वैद्यांकडे जावे लागणार नसल्याचंही पळसकर यांनी म्हटलं आहे.
दंत शास्त्रातील सेंट्रिक जॉ रिलेशन हा विषय गेल्या 100 वर्षांहून अधिक काळ वादाचा ठरला आहे. परंतु या उपकरणाच्या शोधामुळे या वादावर कायमचा पडदा पडणार असल्याचा दावा पळसकर यांनी केला आहे.
तसेच डॉ. जयंत पळसकर हे सध्या अधिष्ठाता, दंत शाखा आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे कार्यरत आहेत. ते विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियतकलीकांच्या संपादक मंडळावर कार्यरत आहेत. तसेच ते काही नियतकालीकांचे मुख्य संपादक म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या या संशोधनामुळे त्यांच्यावर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच पळसकर यांच्या पत्नी डॉ. संगीता पळसकर या देखील याच संस्थेत कार्यरत असून या संशोधनामध्ये त्यांचा देखील मोलाचा वाटा असल्याचं डॉ. पळसकर यांनी म्हटलं आहे.
COMMENTS