मनसेच्या वसंत मोरेंची विधानसभेसाठी हडपसरमधून जोरदार तयारी !

मनसेच्या वसंत मोरेंची विधानसभेसाठी हडपसरमधून जोरदार तयारी !

पुणे – विधानसभेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. कदाचित ती त्यापूर्वीही होऊ शकते. त्यामुळेच विधानसभेचे इच्छुक जोरदार कामाला लागले आहेत. पुण्यातील हडपसर मतदारसंघातून मनसेचे वसंत मोरेही कामाला लागले आहे. सध्या हडपसरमध्ये भाजपाचे योगेश टिळेकर आमदार आहेत. मात्र विविध मुद्द्यांवरुन त्यांच्याविषयी मतदारसंघात चांगलीच नाराजी आहे. योगेश टिळेकर यांचे नवनवे प्रताप जनतेसमोर आणण्यात वंसत मोरे हे आघाडीवर आहेत.

एका खंडणी प्रकरणात आमदार योगेश टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्या पोलीस निरीक्षकाने हा गुन्हा दाखल केला त्याची आठवड्याभरातत बदली करण्यात आली. त्यावरुन पुण्यात आणि हडपसर मतदारसंघात मोठा रोष निर्माण झाला आहे. तो रोष इनकॅश करण्यासाठी वसंत मोरे यांनी पोलीस निरीक्षकांच्या बदलीविरोधात मोर्चा काढला. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसही यामध्ये मागे नव्हती. प्रामाणिकपणे काम करणा-या पोलीस अधिका-यांविरोधात सराकर दबाबतंत्राचा वापर करत आहे. कोणत्याही दबावाला भीक न घातला आमदारांवर गुन्हा दाखल केल्यामुळेच पोलीस निरीक्षकांची बदली केल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे.

यापूर्वीही योगेश टिळेकर यांना एका बिल्डरकडून महागडी गाडी भेट म्हणून मिळाल्याचं प्रकरण पुण्यात गाजलं होतं. महागड्या गाडीचे प्रकरण असो किंवा डीपीमधील बदलाचं प्रकरण असो या सर्व प्रकरणात वसंत मोरे यांनी टिळेकर यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. अर्थात डीपी आणि बिल्डर गाडी प्रकरणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनीही महापालिकेत आणि बाहेरही आवाज उठवला हेही खरेच आहे. टिळेकर यांच्या विरोधातील वातावरण निर्मिती असो किंवा वाढदिवसाची मतदारसंघात पोस्टरबाजी असो. मोरेंची विधानसभेसाठीचीची तयारी तर जोरदात सुरू आहे.

2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर मनसेची राज्यात पूर्णपणे वाताहात झाली आहे. लोकसभेनंतर विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये मनसे पूर्णपणे बॅकफूटवर गेली आहे. मात्र आता ते सर्व अपयश मागे ठेऊन मनसे कामाला लागली आहे. मनसेच्या अगदी वाईट काळातही वसंत मोरे महापालिकेत निवडूण आले. ते सध्या पुणे महापालिकेतील मनसेचे गटनेते आहेत. विधानसभेसाठीची ही त्यांची तयारी त्यांना मुंबईला घेऊन जाणार का ? हे नजीकच्या काळात दिसून येईलच.

वसंत मोरे यांना ही लढाई सोपी नाही. स्थानिक जातीय राजकारण, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधले तगडे प्रतिस्पर्धी, शिवसेनेची ताकद आणि भाजपच्या विद्यमान आमदारांचं आव्हान याच्याशी त्यांना सामना करावा लागणार आहे. आघाडीमध्ये ही जागा बहुदा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीमधून चेतन तुपे,  बंडुतात्या गायकवाड आणि प्रशांत जगातप यांच्यापैकी कोणाला तिकीट मिळते ते पहावे लागेल. शिवसेनेकडून माजी आमदार महादेव बाबर यांनाच पुहा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर वादविवादात अडकलेले असले तरी स्थानिय जातीय राजकारण आणि राज्यातील जातीय राजकारण डोळ्यासमोर ठेऊन पुन्हा एकदा भाजपकडून टिळेकरांना संधी मिळण्याची शक्यता आहे. हडपसर मतदारसंघात बाहेरुन आलेल्या मतदारांची संख्या मोठी आहे. मात्र स्थानिक मतदारांमध्ये मराठा आणि माळी समाजाची संख्या लक्षनिय आहे. टिळेकर वगळता सर्व इच्छुक हे मऱाठा समाजाचे आहेत. अर्थात केवळ जातीय समिकरणामुळे टिळेकर यांना निवडणूक सोपी नाही हेही नक्की….

COMMENTS