पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला पावसाचं विघ्न आलं असून त्यांची पहिलीच सभा रद्द करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. तर सभेच्या मैदानावर चिखल झाल्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे. आजपासून राज्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार होती. पुण्यातून ते प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. पुण्यातील नातू बाग येथील मैदानावर राज ठाकरे यांची सभा होणार आहे. परंतु जोरदार पावसामुळे मैदानावर चिखल आणि पाणी साचले आहे. त्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान बऱ्याच दिवसांपासून शांत असलेले राज ठाकरे आज काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु सभा रद्द झाल्यामुळे त्यांच्या पुढील सभेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. मुंबई, पुणे, नाशिक या शहरी भागात मनसेचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. त्यामुळे मनसेने उमेदवारी देताना ग्रामीण भागापेक्षा शहरी भागावर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. चंद्रकांत पाटील यांना या मतदारसंघातून मनसेचे उमेदवार अॅड. किशोर शिंदे यांचे कडवे आव्हान असणार आहे. ‘भाजप’ने चंद्रकांत पाटील यांना दिलेली उमेदवारी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने ‘मनसे’चे उमेदवार किशोर शिंदे यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याने कोथरूडच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच राज ठाकरे यांच्या सभेमुळेही याठिकाणी मोठा फरक पडणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS