पुणे – महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीत आज पहिली सभा पार पडली. परंतु या सभेत विरोधी पक्षातील नगरसेवक मात्र हेल्मेट घालून आले असल्याचं पहावयास मिळालं. काही नगरसेवकाचं सभागृहात भाषण सुरू असताना अचानक वरून लाकडी ठोकळा पडल्यामुळे आम्ही हेल्मेट घालून आलो असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक योगेश ससाणे सभागृहात हेल्मेट घालून बसले होते.
दरम्यान महापालिकेच्या नवीन सभागृहात लाकडाचा ठोकळा वगैरे पडलेला नाही, वरील आच्छादन लोखंड आणि स्टीलचे आहे. त्यामुळे लाकडाचा संबंध नाही, तसेच विरोधकांकडे लगेच हेल्मेट कुठून आले?” असा सवाल करत हा विरोधकांचा कट असल्याची शक्यता स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी वर्तवली आहे.
दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीचे 21 जून रोजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान सभागृहातील छत पावसाच्या पाण्याने गळत होते. त्यामुळे यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर आज विरोधकांनी केलेल्या या आरोपामुळे महापालिकेचं नवीन सभागृह चांगलंच गाजत असल्याचं दिसत आहे.
COMMENTS