सामनातील अग्रलेखाला विखे पाटलांचं प्रत्युत्तर, “आमची छाती फाडली, तर एका वेळी एकच नेता दिसेल…!”

सामनातील अग्रलेखाला विखे पाटलांचं प्रत्युत्तर, “आमची छाती फाडली, तर एका वेळी एकच नेता दिसेल…!”

अहमदनगर – ‘थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टूरटूर’ या सामनातील अग्रलेखाला
भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक, तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही. आमची छाती फाडून पाहिली, तर एका वेळी एकच नेता दिसेल. तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील असं प्रत्युत्तर विखे पाटील यांनी दिलं आहे. याबाबतचं ट्वीट विखे पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान ‘सामना’ या दैनिकात आपण माझ्यावर थेट अग्रलेख लिहिलात, याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आपल्याच शब्दात सांगायचे तर मी सध्या वनवासात आहे. मी राजकारणापासून दूर राहिलेलेच बरे असा सल्लाही आपण दिला आहे. फक्त जनता जनार्दनाच्या साक्षीने एवढेच सांगू इच्छीतो की मी आपल्या कृपेने राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे आपल्या सल्ल्याने राजकारणापासून दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला, माझ्या मुलाला आणि आतापर्यंत माझ्या घराण्याला राजकारणात भरभरून प्रतिसाद देण्याचे काम त्या जनतेशी आहे. आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक, तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही. नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे. अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी शरदाच्या चांदण्यात भिजतेय असा दुटप्पीपणा कोण करतेय तेही लपून राहिलेले नाही अशी जोरदार टीरा विखे यांनी केली आहे.

आजच्यासारखी लाचारी बाळासाहेबांच्या काळात नव्हती. धारदार अग्रलेखांची परंपरा तेंव्हा होती. तेव्हा खरे रोखठोक अग्रलेख असत. आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद टाळेबंदीच्या काळात स्वीकारले का? आम्ही राजकीय पक्ष बदलले पण ज्या पक्षात राहिलो त्याचे निष्ठेने काम केले, आमची छाती फाडून पाहिली, तर एका वेळी एकच नेता दिसेल. तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील. तुमचा हा बेगडीपणा लोकांना चांगलाच कळतो असंही विखे पाटील म्हणाले आहेत.

COMMENTS