अहमदनगर – आगामी विधानसभा निवडणुकीत अहमदनगरमधील राजकीय वातावरण चांगलच तापण्याची शक्यता आहे. कारण एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात जोरदार सामना रंगणार असल्याचं चिन्ह आहे. आगामी निवडणुकीत थोरात यांना धक्का देण्यासाठी विखे पाटलांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. बाळासाहेब थोरात यांना घरच्या मैदानावर पराभूत करण्यासाठी विखेंनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांचे आणि राजकीय गुरू असलेल्या बाळासाहेब वाघ यांची घरी जाऊन भेट घेतली आहे. तसंच यावेळी विखेंनी नतमस्तक होऊन बाळासाहेब वाघ यांचे आशीर्वाद घेतले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत थोरातांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी विखे पाटलांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली असल्याचं दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांना शह देण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातच संपर्क कार्यालय सुरू केलं आहे. त्यानंतर आज बाळासाहेब वाघ यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये असतानाही एकमेकांचे विरोधक असलेल्या
बाळासाहेब थोरात आणि विखे पाटलांचं राजकीय युद्ध आणखी तीव्र झालं असल्याचं दिसत आहे.
COMMENTS