मुंबई – रब्बी पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्यात आल्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. तसेच हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ जुमलेबाजी असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, रब्बी पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्यात आल्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा वस्तुस्थितीशी सुसंगत नाही. कृषि मूल्य आयोगाने गव्हाला 1735 रूपये तर तुरीला 4250 रूपये हमीभाव प्रस्तावित केला होता. तेच दर केंद्र सरकारने हमीभाव म्हणून जाहीर केले आणि हे दर उत्पादन खर्चाच्या दीडपट नफा देणारे नाहीत. तसेच हा जुमलेबाज अर्थसंकल्प आहे. पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने देशाला जुमले विकण्याचे प्रयत्न केले आहेत. असेच अनेक जुमले त्यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सांगितले होते. त्याचे पुढे काय झाले, ते संपूर्ण देशाला माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातील नव्या जुमलेबाजीवर जनता विश्वास ठेवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असंही विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS