नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी संध्याकाळी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांनी काल संध्याकाळी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. तसेच शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यामध्ये झालेल्या तासाभराच्या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. या भेटीमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीबात चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच आगामी काळात राजकीय वर्तुळात मोठा बदल होणार असल्याचं बोललं जात असून राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनाही भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यामधील सलग दोन दिवसातील ही दुसरी भेट असल्यामुळे चर्चेला जोरदार उधाण आलं आहे. त्यातच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सपा-बसपानं मिळून भाजपला अपयशाची धूळ चारली. त्यानंतर लगेचच दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आल्याच दिसत आहे. तसेच आगामी निवडणुकीत भाजपला धूळ चारण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्रित करुन वेगळी रणनिती आखली जात असल्याचं बोललं जात आहे.
दोन दिवसापूर्वीच सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करण्यासाठी सोनिया गांधींनी मेजवानीचं आयोजन केलं होतं. निमित्ताने भाजपविरोधातील समविचारी पक्षांशी अनौपचारिक बोलणी केली होती. सोनिया गांधी यांच्या मेजवाणीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआयएम, सीपीआय, तृणमूल काँग्रेस यांसह 20 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. या डिनर डिप्लोमसीनंतर राहुल गांधींनी संपर्क अभियानाला सुरुवात केल्याचं दिसत असून त्यांनी सर्वप्रथम शरद पवार यांची भेट घेतली आहे.
COMMENTS