गोंदिया – भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणखी एक जबाबदारी सोपवली आहे. नाना पटोले यांची किसान, खेत, मजदूर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. अशोक गहलोत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे त्यांची नियुक्ती केली आहे. याबाबत अशोक चव्हाण यांनी ट्वीटवरुन पटोले यांचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार महादेवर शिवणकर हे भाजप किसान आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिल्यानंतर पटोले हे राजकीय पक्षाच्या किसान आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणारे दुसरे विदर्भातील नेते ठरले आहेत.
दरम्यान शेतकऱ्यांच्या मुद्यावरून नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून भाजपला रामराम ठोकला होता. यानंतर त्यांची काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यात पटोले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचे फळ म्हणून पटोले यांना राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी सोपविली असल्याचं बोलले जात आहे.
COMMENTS