नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी सकाळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात जाऊन आपला अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल गांधी यांच्यासोबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आला असल्यामुळे अध्यक्षपदी राहुल गांधी यांची बिनविरोध निवड होणार असल्याचं निश्चित झालं आहे.
राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी 900 नेते काँग्रेस मुख्यालयात उपस्थित होते. राहुल गांधींच्या उमेदवारीचा कार्यक्रम भव्य बनवण्यासाठी मोठ्या संख्येनं या नेत्यांनी अकबर रोड इथल्या मुख्यालयात उपस्थिती लावली होती.
10 एआयसीसी सदस्यांच्या 90 ग्रुपने दिला प्रस्ताव
काँग्रेसच्या निवडणूक प्रक्रियेनुसार, अध्यक्षपदाच्या निवणुकीत 10 AICC सदस्यांनी उमेदवारासाठी प्रस्ताव ठेवणं गरजेचं असतं. मिळालेल्या माहितीनुसार, 10 AICC सदस्यांच्या 90 ग्रुपने राहुल गांधींचा प्रस्ताव दिला आहे.
गांधी घराण्यातील राहुल गांधी होणार सहावे अध्यक्ष
राहुल गांधी हे काँग्रेसचे 18 वे अध्यक्ष असणार आहेत. तर गांधी घराण्यातील अध्यक्षपद भूषविणारे ते सहावे व्यक्ती असणार आहेत. यापूर्वी नेहरु-गांधी कुटुंबातून सर्वात अगोदर मोतीलाल नेहरु 1919 साली पक्षाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर मोतीलाल नेहरु यांचे चिरंजीव आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी अध्यक्षपद सांभाळलं त्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. सोनिया गांधी या सलग 19 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवली जाणार आहे.
आतापर्यंतचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी
1) आचार्य कृपलानी – 1947
2) पट्टाभी सितारामय्या – 1948-49
3) पुरुषोत्तमदास टंडन – 195
4) जवाहरलाल नेहरु – 1951-54
5) यू. एन. धेबर – 1955-59
6) इंदिरा गांधी – 1959
7) नीलम संजीव रेड्डी – 1960–63
8) के. कामराज – 1964–67
9) निजलिंगअप्पा – 1968
10) जगजीवनराम – 1970–71
11) शंकर दयाळ शर्मा – 1972–74
12) देवकांत बरुआ – 1975-77
13) इंदिरा गांधी – 1978–84
14) राजीव गांधी – 1985–91
15) पी. व्ही नरसिंहराव – 1992–96
16) सिताराम केसरी – 1996–98
17) सोनिया गांधी – 1998 ते आजपर्यंत
COMMENTS