नागपूर – पावसाळी अधिवेशनात पावसाचे विघ्न, कामकाज ठप्प !

नागपूर – पावसाळी अधिवेशनात पावसाचे विघ्न, कामकाज ठप्प !

नागपूर – विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पावसाचेच विघ्न आलं असल्याचं दिसत आहे. रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे विधीमंडळ परिसरात पाणी साचलं असून विधीमंडळातील वीज देखील खंडित झाली आहे. त्यामुळे आजचं विधीमंडळाचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. तळघरात पाणी साचल्याने विधान भवनातील वीज पुरवठा खंडित झाला असून अंधारामुळे विधान भवनातील कामकाज ठप्प झालं आहे. तसेच वीज नसल्याने कामकाज बंद करावे लागल्याची ही पहिलीच वेळ असून  विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.

दरम्यान गुरुवारी रात्रीपासून झालेल्या दमदार पावसामुळे विधान भवनाच्या परिसरात पाणी साचले आहे. त्यामुळे सकाळी विधान भवनात प्रवेश करताना आमदारांची तारांबळ उडत होती. तसेच काही वेळाने विधान भवनातील वीज पुरवठाही खंडीत झाल्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे. तसेच आमदारांना अंधारातच बसावे लागले असून नाणार प्रकल्पाचा विरोध करणाऱ्या शिवसेना आमदारांनी मोबाईलमधील टॉर्चच्या प्रकाशात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान सरकारच्या हट्टीपणामुळे ही वेळ ओढावली असून मुंबई तुंबताना बघितली आहे, पण आज काही तासांच्या पावसात नागपूरही तुंबताना बघितले, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

 

COMMENTS