मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यावेळी बोलत असताना राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची बाजूही घेतली नाही आणि त्यांना विरोधही केलं नसल्याचं दिसून आलं आहे. परंतु आपण राज्यातील जनतेचा कैवारी असल्याचं राज यांनी यावेळी म्हटलं आहे.पहिलं प्राधान्य राज्यातील नागरिकांनाच दिलं पाहिजे, तसेच आपण ज्या राज्यात जातो त्या राज्यातली भाषा शिकणं गरजेचं असल्याचे खडेबोल राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना दिले आहेत.
दरम्यान आज राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच हिंदीतून भाषण केलं आहे. फक्त तुमचा प्रश्न असता तर मराठीत बोललो असतो. पण हे भाषण उत्तर प्रदेश, बिहारमधील लोक पाहणार आहेत असं सांगितल्याने हिंदीत बोलत असल्याचं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. सत्य कटू असतं पण तुम्ही ते समजलं पाहिजे. मी शाळेत असल्यापासून हिंदी चांगलं आहे.
माझ्या वडिलांचं उर्दू चांगलं होतं, त्यांच्यामुळे माझं हिंदी चांगलं आहे. दुसरं कारण म्हणजे चित्रपट. हिंदी भाषा चांगली आहे त्यात दुमत नाही, पण ती राष्ट्रभाषा आहे हे चुकीचं. राष्ट्रभाषेचा निर्णय कधी झालेलाच नसल्याचं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान रेल्वे परीक्षेदरम्यान झालेली मारहाण, फेरीवाले यावर प्रश्न विचारण्यात आले. पहिल्यांदा आपण आपला देश समजला पाहिजे. आपल्या देशाची राज्यघटना, कायदा काय सांगतो हे समजलं पाहिजे, त्यामुळे इतर गोष्टी सहज होतील. या देशातील व्यक्ती कुठेही जाऊ शकतो, राहू शकतो असं म्हटलं जातं. पण कायदा कोणी वाचला आहे असं वाटत नाही.
एक राज्य सोडून येता तेव्हा तुम्हाला पोलीस ठाण्यात जाऊन सर्व माहिती देणं गरजेचं असतं. एका राज्यातून आले आणि दुसऱ्या राज्यात गेले असं होत नाही. येथूनच खरी समस्या निर्माण होते. मी स्पष्टीकरण देण्यास आलेलो नाही, फक्त माझी भूमिका हिंदीतून सांगण्यासाठी आलो असल्याचंही यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS