मुंबई – मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मनसेच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करीत राज्य सरकारवर ठाकरे शैलीत समाचार घेतला.
दादरमधील शिवाजी पार्क परिसरात मनसेच्यावतीने आयोजित मराठी स्वाक्षरी मोहीम कार्यक्रमानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “सर्व कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारमधील जे मंत्री आहेत किंवा इतर लोकं… ते गर्दी करुन धुडगूस घालू शकतात. शिवजयंतीला परवानगी नाकारता. मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला नकार देता. करोनाचं संकट परत येतंय असं वाटत असेल, तर निवडणुकाही पुढे ढकलाव्यात. ज्या आता जाहीर करण्यात आल्या. त्या एका वर्षानंतर घ्या, काही फरक पडत नाही,” असं म्हणत राज ठाकरेंनी नियमावलीवरून सरकारला सुनावलं.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर राज यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राज म्हणाले, “खरं तर त्यांच्या मनात आहे की, नाही. फक्त आपलं संभाजीनगरसारखं करायचंय. अशा प्रकारचे दिवस आल्यानंतरच सरकारला जाग का येते? त्यांना असं बोलावं का वाटतं. इतकी वर्ष यांच्या हातातच सरकार आहे. मग का होत नाहीत या गोष्टी. या मुद्द्यात राजकारण कसलं. इच्छा असली पाहिजे. इच्छा असेल तर होईल,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
COMMENTS