मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी वाढीव वीज बिलाचा प्रश्न राज्यपालांपुढे मांडला.
लॉकडाऊनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल देण्यात आले आहे. याबद्दल आम्ही राज्य सरकारशी बोललो. पण, त्यावर अजूनही कोणताही तोडगा निघाला नाही. म्हणून राज्यपालांशी बोलण्यासाठी आलो, असल्याचं राज म्हणाले.ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणं झालं. त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं परंतु अजून तो होत नाही. राज्यपालांशी बोलल्यानंतर त्यांनी एकदा शरद पवारांशी बोलून घ्या असं सांगितलं. मी पवार साहेबांशीही बोलणार आहे. तसेच वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांना भेटणार. हा विषय त्यांना माहिती नाही असं नाही. अर्थात त्यांना कोणतीही गोष्ट सांगितली की त्यावर काम सुरु असल्याचं सांगतात पण त्यावर निर्णय होत नाही, असा टोलाही राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
दरम्यान राज्य सरकारला हा विषय माहीत आहे असं मला वाटतं. लोकांना जिथे २००० बिल येत होतं तिथे १० हजार बिल येत आहे. राज्य सरकारला माहिती आहे तर मग प्रकरण कशात अडकलंय हे कळत नाही. गेली अनेक दिवस माझा पक्ष, कार्यकर्ते वाढीव वीज बिलासंदर्भात आंदोलन करत आहेत. याप्रकरणी अदानी, बीएसटीचे लोक भेटून गेले. वीज बिल आम्ही कमी करु शकतो पण एमईआरसीने आम्हाला मान्यता दिली पाहिजे असं त्यांनी सांगितलं.
पक्षाचं एक शिष्टमंडळ जाऊन एमईआरसीच्या लोकांना भेटून आले. त्यांच्याकडन लेखी स्वरुपात पत्र आलं. कंपन्या वीज बिलं कमी करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. आमचं त्यांच्यावर दडपण नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एका बाजूला कंपन्या एमईआरसीकडे बोट दाखवत आहेत, दुसरीकडे एमईआरसी आमचं काही दडपण नसल्याचं म्हणतय.अनेकांचे रोजगार गेलेत, पैसे नाहीत त्यात बिल कसे भरणार? एका छोट्या निर्णयासाठी एवढे दिवस लागणार याला काय अर्थ आहे. एक दोन दिवसात निर्णय घ्यावा अशी विनंती आहे. त्यामुळे आता एकदा शरद पवारांची भेट घेणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
COMMENTS