मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भेट घेतली. ४५ मिनिटांच्या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली असल्याची माहिती आहे. शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे सायंकाळी ही भेट झाली. लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करताना नरेंद्र मोदी व अमित शहा मुक्त भारताची हाक देत महाराष्ट्रात प्रचाराची राळ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उठवली होती.
‘लाव रे तो व्हीडिओ’हे त्यांचे वाक्य चांगलेच गाजले होते तथापि प्रत्यक्षात राज यांच्या भाषणांमुळे मतांमध्ये परिवर्तन होऊ शकले नाही. एवढेच नव्हे तर मुंबईसह राज्यात राज यांनी जेथे जेथे प्रचार केला त्यातील बहुतेक जागी काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी मनसेला सोबत घेणार का हे पाहण गरजेचं आहे.
दरम्यान मंगळवारी सायंकाळी राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.त्यानंतर राज ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर मनसेला आघाडीत घेण्याच्या हालचाली आहेत. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काल काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीची मंथन बैठक झाली. या बैठकीत विधानसभेला मनसेला बरोबर घ्यावं असा सूर महाआघाडीच्या नेत्यांचा होता. त्यामुळे शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
COMMENTS