जयपूर – विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मोठ मोठे दावे केले होते. विधानसभेची निवडणुक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी वाटपाबाबत अनेक दावे केले होते. तिकीट वाटपात वरुन उमेदवार लादणार नाही, जातीच्या आधारावर उमेदवारी देणार नाही, नेत्यांच्या परिवारामध्ये तिकीटे देणार नाही, गुन्हेगारी पार्श्वभूमी आसलेल्यांना तिकीटे देणार नाही असे एक ना अनेक दावे केले होते. मात्र दोन्ही पक्षांनी हे सर्व दावे साफ खोटे ठरवले आहे. दोन्ही पक्षांनी अनेक नेत्यांच्या घरात तिकीटे दिली आहेत. पाहूतयात या पक्षांनी काही महिन्यांपूर्वी दिलेले दावे स्वतःच कसे खोटे ठरवले.
पहिला खोटा दावा – आयाराम गयाराम यांना तिकीटे देणार नाही
दोन्ही पक्षांनी आयाराम गयाराम यांना तिकीट देणार नाही असा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. मात्र दुस-या पक्षातून आलेल्या उमेदवारांना त्याच क्षणी तिकीट देण्यात आली आहेत. दोन्ही पक्षांनी जवळपास प्रत्येकी 10 आयाराम गयारामांना तिकीट दिली आहेत. काँग्रेसने हरीश मीणा, कन्हैयालाल झंवर, सोना देवी बावरी, मानवेंद्र सिंह, सवाई सिंह चौधरी, राजकुमार शर्मा यासारख्या भाजपमधून आलेल्या नेत्यांना तिकीट दिलं आहे. तर रामकिशोर सैनी, ओपी सैनी, अभिनेष महर्शी, ममता शर्मा, गुरूदीप सिंह, नरेंद्रकुमार यासारख्या काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना भाजपने तिकीटे दिली आहेत.
दुसरा खोटा दावा – दोन वेळा पराभूत झालेल्यांना तिकीट देणार नाही
यापूर्वी विधानसभा निवडणूक लढवलेल्या आणि दोन वेळा पराभूत झालेल्यांना तिकीटे देणार नाही असा दावा दोन्ही पक्षांनी केला होता. मात्र तोही दावा दोन्ही पक्षांनी खोटा ठऱवला आहे. बीडी कल्ला या दोन वेळा पराभूत झालेल्या नेत्याला काँग्रेसने तिकीट दिले आहे. तर जे उमेदवार दोन वेळा पराभूत झाले आहेत. त्यांना तिकीट न देता त्यांच्या परिवारातील व्यक्तीला दोन्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणात तिकीटे दिली आहेत. उम्मेदसिंह या दोन वेळा पराभूत झालेल्या नेत्याच्या पत्नी मीन कंवर यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. नईमुद्दीन गुड्डु यांच्या पत्नीलीला रिंगणात उतरवण्यात आलं आहे.
तिसरा खोटा दावा – तिकीट वाटपात घराणेशाही मोडीत काढू
तिकीट वाटपात घरणेशाही येऊ दिली जाणार नाही असा दावाही दोन्ही पक्षांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. मात्र तिकीट वाटपातील यादीवर नजर टाकल्यास दोन्ही पक्षांचा हा दावा हवेत विरल्याचं दिसत आहे. दोन्ही पक्षांनी मिळून जवळपास 30 राजकारण्यांच्या घरात तिकीटांचं वाटप केलं आहे. भाजपनं 10 तर काँग्रेसनं 20 नेत्यांच्या घरामध्ये तिकीट वाटप केलं आहे.
चौथा खोटा दावा – महिलांना मोठ्या प्रमाणात तिकीटे देऊ
विधानसभा निडणुकीत महिलांना मोठ्या प्रमाणात तिकीटे दिली जातील असंही आश्वासन दोन्ही पक्षांनी दिलं होतं. मात्र नेहमीप्रमाणे तेही पाळण्यात आलेलं नाही. भाजपनं केवळ 23 महिला उमेदवार दिले आहेत. तर काँग्रेसनं 26 महिला उमेदवार दिले आहेत. राजस्थानमध्ये एकूण जागा 200 आहेत. त्यामध्ये भाजपने 11.50 टक्के तर काँग्रेसने 13.50 टक्के एवढे अल्प महिला उमेदवार दिले आहेत.
पाचवा खोटा दावा – गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तिकीटे देणार नाही
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कलंकित नेत्यांना विधानसभेचे तिकीट देणार नाही असा दावा दोन्ही पक्षांनी केला होता. मात्र तिकीट वाटपावर नजर टाकल्यास दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार आहेत. केवळ निवडून येण्याची क्षमता याच निकषावर तिकीट वाटप झाल्याचं दिसून येत आहे. दोन्ही पक्षात मिळून तब्बल 50 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार आहेत. भाजपनं अशा 20 उमेदवारांना तर काँग्रेसनं तब्बल 30 उमेदवारांना तिकीटे दिली आहेत.
सहावा खोटा दावा – जात पाहून तिकीटे दिली जाणार नाहीत
जात पाहून नाही तर उमेदवाराचं काम पाहून आणि त्याचे एकंदरित कॅरॅक्टर पाहून तिकीट वाटप केलं जाईल असं दोन्ही पक्षांनी सांगितलं होतं. मात्र ते पाळल्याचं अजिबात दिसत नाही. उलट जात पाहूनच दोन्ही पक्षांनी तिकीट वाटप केल्याचं दिसून येत आहे. सोशल इंजिनिअरिंग असं गोंडस नाव देत दोन्ही पक्षांनी तिकीट वाटप केलं आहे. काँग्रेसनं यावेळी 15 मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर भाजपनं केवळ एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले आहे.
सातवा खोटा दावा – जनाधार पाहून आणि सर्व्हेच्या आधारावर तिकीटे देऊ
कोणताही उमेदवार वरुन लादला जाणार नाही, वशील्याने तिकीट वाटप होणार नाही अशी आश्वासने दोन्ही पक्षांनी काही महिन्यांपूर्वी दिली होती. सर्व्हेच्या आधारावर जनाधार असलेल्या उमेदवारांना तिकीटे दिली जातील असंही दोन्ही पक्षांनी सांगितलं होतं. मात्र उमेदवार जाहीर करुन पुन्हा त्यांची तिकीटे कापण्यात आली. काही जणांचे पत्ते रातारोत कट करण्यात आले त्या ठिकाणी वशील्याचे उमेवार देण्यात आले आहेत.
COMMENTS