नवी दिल्ली – राजस्थानमधील विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे याठिकाणचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच एका सर्व्हेमधून राजस्थानमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे तर काँग्रेसला बहूमत मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत टाईम्स नाऊ आणि सीएनएक्सनं सर्व्हे केला होता. या सर्व्हेत काँग्रेसची बहुमतानं सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर वसुंधरा राजेंच्या नेतृत्वात भाजपचा दारूण पराभव होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राजस्थानातील सर्व विधानसभा मतदारसंघांतून एकूण ८ हजार ४० लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत त्यातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
टाइम्स नाऊ आणि सीएनएक्सच्या सर्व्हेनुसार राजस्थान विधानसभेत काँग्रेसला २०० जागांपैकी ११० ते १२० जागा तर सत्ताधारी भाजपला ७० ते ८० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०१३च्या निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या २१ तर भाजपला १६३ जागा मिळाल्या होत्या. परंतु या निवडणुकीत परिस्थिती अगदी उलटी होणार असून काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळतील असा कौल जनतेनं दिला आहे.
केंद्र पास राज्य नापास
दरम्यान केंद्र आणि राज्यातील सरकारच्या कारभाराबाबत विचारलेल्या प्रश्नावर केंद्राला चांगला शेरा देण्यात आला आहे तर राज्यातील सरकार नापास झालं असल्याचं सर्व्हेमध्ये जनतेनं म्हटलं आहे. केंद्रातील मोदी सरकार चांगलं काम करत असल्याचं ६३ टक्के लोकांनी म्हटलं आहे तर वसुंधराराजे सरकारला केवळ २५ टक्के लोकांनीच पसंती दिली आहे. १२ टक्के लोकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
बेरोजगारीचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा
राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत बेरोजगारीचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा असल्याचे मत ३५ टक्के लोकांनी नोंदवलं आहे. विकास हा मुख्य मुद्दा असेल, असे २७ टक्के लोकांचे मत आहे. वसुंधरा राजे यांच्या कारभारावर ४८ टक्के लोकांनी नापसंती व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं या सर्व्हेतून तरी दिसत आहे.
COMMENTS