राजभवनावर हालाचाली वाढल्या, भाजप नेत्यांनंतर महाविकास आघाडीचे नेते घेणार राज्यपालांची भेट!

राजभवनावर हालाचाली वाढल्या, भाजप नेत्यांनंतर महाविकास आघाडीचे नेते घेणार राज्यपालांची भेट!

मुंबई – राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनावर राजकीय हालाचाली वाढल्या आहेत. कारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांसह राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आता महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. आज संध्याकाळी ६ वाजता ते राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्याबाबतचं नवीन पत्र  महाविकासआघाडीचे नेते राज्यपालांना देणार आहेत.काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर पाठवण्यात यावं, अशी विनंती राज्य मंत्रिमंडळाने पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केली आहे.

दरम्यान काल रात्री उशीरा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महाविकासआघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली होती. शरद पवार आणि उद्धव ठाकरेदेखील या बैठकीला हजर होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, परिवहन मंत्री अनिल परब हे देखील या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा प्रस्ताव मंजूर केला नाही, तर पुढे उद्भवणारी परिस्थिती आणि पर्याय यावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी माहिती दिली. त्यामुळे आज होणाय्रा राज्यपालांसोबतच्या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS