मुंबईः राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करून त्याद्वारे नागरिकांना रक्तदान करण्याचा संदेश दिला. गुरुवारी दुपारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. अरूण थोरात आदी उपस्थित होते.
राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले, शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रकियेसाठी ८०० रुपये शुल्क आकारले जाते. आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्याला मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
COMMENTS