राजू शेट्टींची विधानसभेसाठी तयारी, राज ठाकरेंची घेतली भेट !

राजू शेट्टींची विधानसभेसाठी तयारी, राज ठाकरेंची घेतली भेट !

मुंबई – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत हातकणंगले या मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर आज शेट्टींनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. सोमवारी राजू शेट्टी यांनी पराभवाच्या पार्श्वभूमीवर कवितेच्या माध्यमातून खचून न जाता पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा इरादा व्यक्त केला होता. ‘आजपासून..’ या शीर्षकाच्या कवितेद्वारा शेट्टी यांनी लोकप्रतिनिधी नसलो तरी चळवळीला बांधील असून मी संत नाही शांत आहे ,गोतावळ्यातून दुरावलो ,याची मनात खंत आहे, असे म्हटले होते. त्यानंतर आज त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.

दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेचे नवखे उमेदवार धैर्यशील माने यांनी त्यांच्यावर लाखाहून अधिक मताने मात केली. त्यामुळे आता लोकसभेचा पराभव विसरुन राजू शेट्टी हे विधानसभेच्या तयारीला लागले असल्याचं दिसत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या भेटीविषयी ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटला ‘शेतकऱ्यांची मनसे’ असा हॅशटॅग वापरला आहे. यातून मनसे शेतकऱ्यांच्या आणि शेतकरी नेत्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, असा संदेश देण्याचा मनसेने प्रयत्न केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मनसे आणि राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्रित दिसेल अशी चर्चा आहे.

COMMENTS