सातारा – लोकसभेमध्ये संपूर्ण कर्जमुक्तीचे अधिकार विधेयक आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाचे अधिकार विधेयक मांडले आहे. त्याला सत्ताधारी शिवसेनेबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादीसह 23 पक्षांनी पाठिंबा दिला आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तांतर झाल्यास ज्यावेळी हे विधेयक चर्चेला येईल त्यावेळी त्याचे विधेयकात रुपांतर झाले पाहिजे हा आमचा मुख्य मुद्दा आहे. असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. ते काल कराडमध्ये बोलत होते.
भाजपला आमचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी दोन्ही विधेयके सरकारी विधेयके म्हणून मांडून त्याचे कायद्यात रुपांतर करावे, असं खुलं आव्हान खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकारला दिलं. तसं त्यांनी केलं तर त्यांच्यासोबत जाऊ असंही खासदार शेट्टी म्हणाले. मात्र जाहीरनाम्यात आश्वासन देऊनही गेल्या साडेचार वर्षात त्यांनी ते केलं नाही. यापुढे त्यांच्याकडून अपेक्षाही नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येणार नाही असंही शेट्टी यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शेट्टी पत्रकारांशी बोलत होते.
COMMENTS