“फडणवीस जर मुख्यमंत्री असते तर त्यांनी पीएम फंडाला निधी द्या, असं सांगितलं असते का?”, भाजपच्या नेत्यांवर राजू शेट्टी संतापले !

“फडणवीस जर मुख्यमंत्री असते तर त्यांनी पीएम फंडाला निधी द्या, असं सांगितलं असते का?”, भाजपच्या नेत्यांवर राजू शेट्टी संतापले !

मुंबई – कोरोनामुळे राज्यासह देशातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे सरकारनं अनेकांना मदतीचं आवाहन केलं आहे. पीएम आणि सीएम फंडात अनेक जण मदत करत आहेत. राज्यातील भाजपा नेत्यांनी पीएम फंडाला निधी जमा केला असून, मदत करण्याचं आवाहनही केलं आहे. भाजपाच्या कृतीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे. आज सगळ्यांनी कोरोनाच्या विरोधात लढण्याची गरज असताना भाजपाचे नेते पोरकटपणे वागत आहेत. त्यांना वेळेचे गांभीर्य नाही. मुख्यमंत्री फंडाला दिलेली मदत उद्धव ठाकरे घरखर्चाला वापरणार नाहीत किंवा पीएम फंडाला दिलेली मदत पंतप्रधान घरी नेणार नाहीत, हे खरं आहे.

दरम्यान महापूराच्या काळात सर्वच राजकीय पक्षांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली होती. तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी पीएम फंडाला मदत द्या, असं सांगितलं नाही. आता फडणवीस जर मुख्यमंत्री असते तर त्यांनी पीएम फंडाला निधी द्या, असं सांगितलं असते का? आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे भाजपाचे नेते असं वागत आहेत का?,” असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.

तसेच मुख्यमंत्री पदावर कोण आहे, हे बघण्यापेक्षा ते घटनात्मक पद आहे. त्या पदाचा मान राखला पाहिजे. पण भाजपावाले असल्या अडचणीच्या काळात सुद्धा सूडबुद्धीनं वागत आहेत. सत्ता गेल्याचा राग अजून त्यांच्या मनातून गेलेला नाही, हे यातून दिसत असल्याची टीकाही राजू शेट्टी यांनी केली आहे.

आज महाराष्ट्र सरकारला पैशांची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आणि उद्योजकांनी मुख्यमंत्री फंडाला मदत करावी असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे.

COMMENTS