मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे दोघं एकमेकांना भेटले असले तरी त्यांचे स्वभाव बदलणार नाहीत. त्यामुळे त्यातून काही निष्पन्न होणार नसून माधुरी दीक्षित यांना भेटले तसेच ते उद्धव ठाकरेंना भेटले असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघातील शिक्षक भारतीचे उमेदवार कपिल पाटील आणि पदवीधर मतदारसंघातील उमेदवार जालिंदर सरोदे यांना राजू शेट्टी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. तसेच काँग्रेसने कपिल पाटील यांना पाठिंबा दिलाय, पण जालिंदर सरोदे यांना पाठिंबा दिला नाही. भविष्यात समविचारी पक्षांनी एकत्र यावे असे वाटत असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा द्यायला हवा असंही यावेळी शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसेच आपले उमेदवार अडचणीत आले की काँग्रेस, राष्ट्रवादीने धर्मनिरपेक्ष भूमिका घ्यायची सवय सोडून द्यावी, या ठिकाणी या चळवळीतील उमेदवारांना पाठिंबा द्यावा असही शेट्टी यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाणार का?
देशात सर्व विरोधक एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट असून आम्हाला केवळ सत्तांतर घडवण्यात रस नाही तर शेतकर्यांना न्याय मिळाला पाहिजे असंही यावेळी राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
COMMENTS