मुंबई – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शिवसेनेच्या आजच्या मोर्चावर टीका केली आहे. ही शिवसेनेची नौटंकी असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून विमा कंपन्यासोबत करार केला आहे. अधिकाऱ्यांनी अहवाल तयार केले तेव्हा शिवसेना झोपा काढत होती का ?”. मी दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पुरावे दिले होते असंहू राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
तसेच एकीकडे सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी आम्ही काहीतरी करतो ही नाटकं करायची. शिवसेनेचा हा दुटप्पीपणा संपूर्ण महाराष्ट्राला समजलेला असल्याची टीकाही यापूर्वी शेट्टी यांनी केली होती.
दरम्यान पीक विम्या कंपन्यांविरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मोर्चा काढण्यात आला आहे.बीकेसीतील एशियन हार्ट हॉस्पिटलपासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील भारती एक्सा या विमा कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येत आहे. विमा कंपन्या जाणून-बुजून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.परंतु सत्तेत असूनही कंपन्यांवर दबाव न आणता रस्त्यावर मोर्चा काढून शिवसेनेला नेमकं काय दाखवायचं
असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते, मंत्री मोर्चात सहभागी झाले आहेत. शिवसेनेच्या याच मोर्चावर राजू शेट्टी यांनी टीका केली आहे.
COMMENTS