कोरोनामुळे अडकलेल्या मेंढपाळ धनगर समाजाला मदत करा, महाराष्ट्र यशवंत सेनेच्या राजू झंजेंच मुख्यमंत्र्यांना पत्र!

कोरोनामुळे अडकलेल्या मेंढपाळ धनगर समाजाला मदत करा, महाराष्ट्र यशवंत सेनेच्या राजू झंजेंच मुख्यमंत्र्यांना पत्र!

मुंबई – राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे अनेक जण संकटात सापडले आहेत. कोरोनाला हरवण्यासाठी जिल्ह्यांच्या आणि गावांच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे गावातून कोणाला बाहेर जाता येत नाही तर बाहेरच्यांना गावात जाता येत नाही. या लॉकडाऊनमुळे अनेक जण अडचणीत सापडले आहेत. याचा फटका राज्यातील मेंढपाळ धनगर समाजालाही बसत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना गावात शिरू दिलं जात नाही. मेंढपाळ गावाबाहेर रानावनात राहत असले तरी अन्न – धान्यावाचून उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. सोबत मेंढ्या असल्यामुळे सरकारी शेल्टर होम्समध्येही राहण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे या धनगर बांधवांना मदत करण्याची मागणी महाराष्ट्र यशवंत सेनेचे प्रमुख राजू झंजे यांनी केली आहे. याबाबत झंजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

राजू झंजे यांचं पत्र

प्रति,

मा. श्री.उद्धवजी ठाकरे
मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य.

विषय-कोरोनाच्या या साथीत मेंढपाळ धनगर समाजाला मदत करण्या संदर्भात.

आदरणीय उद्धवजी,

जय महाराष्ट्र… जय मल्हार…

उपरोक्त विषयास अनुसरून आपणास सांगू इच्छितो की राज्यात सुमारे दीड लाख मेंढपाळांचे कळप आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना गावात शिरू दिलं जात नाहीये. मेंढपाळ गावाबाहेर रानावनात राहत असले तरी अन्न – धान्यावाचून उपासमारीची वेळ आलीय. सोबत मेंढ्या असल्यामुळे सरकारी शेल्टर होम्स मध्येही राहण्याची व्यवस्था नाही.

कोरोनाच्या या महामारीच्या साथी मध्ये आपण ज्या पद्धतीने काम करत आहात सर्वांना धीर देत आहात सगळ्या यंत्रणांवर लक्ष ठेवून त्यांना सातत्याने कार्यरत ठेवत आहात याचा आम्हाला अभिमान आहे.आपला आम्हाला खरच आधार वाटतोय.त्यामुळे या महामारीच्या साथीत आमच्या भटक्या मेंढपाळ समाजाकडे लक्ष देऊन तातडीने मदद आणि उपाययोजना करावी ही आपणास नम्र विनंती.

धन्यवाद

आपला,

राजू झंजे
प्रमुख
महाराष्ट्र यशवंत सेना.

 

COMMENTS