स्वाभिमानी शेतकरी संघटनेची “या” 6 लोकसभा मतदारसंघात सुरू आहे तयारी !

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची “या” 6 लोकसभा मतदारसंघात सुरू आहे तयारी !

आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षासोबत आघाडी करायची याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अजून निर्णय झालेला नाही. भाजप सरकावर राजू शेट्टी आणि त्यांचा पक्ष कडाडून हल्ला करत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये समाजवादी पार्टी, बसपा, आरपीआयचे गट, माकपा, शेकाप यांच्या समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेला स्वाभिमानीच्या वाट्याला किती जागा येतील हा प्रश्न आहे. त्यामुळे काँग्रेससोबत आघाडी झाली नाही तर शिवसेना, बच्चू कडू यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना जाऊ शकते अशीही शक्यता आहे.

लोकसभेत कोणत्याही आघाडीसोबत जाणार हे निश्चित नसलं तरी पक्षाकडून लोकसभेच्या 6 जागांची तयारी केली जात आहे. या सहाही जागांवरील इच्छुक त्या त्या मतदारसंघात दौरे करत आहेत. राजू शेट्टी अर्थातच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदारसंघातून पुन्हा एकदा लढणार आहेत. त्याशिवाय कोल्हापूर मतदारसंघातूनही पक्षाची तयारी सुरू आहे. जालिंदर पाटील किंवा भगवान काटे हे कोल्हापूरमधून इच्छुक आहेत. या दोघांपैकी एकाला कोल्हापूरमधून तिकीट दिलं जाऊ शकतं. दोघांनीही या मतदारसंघाची तयारी सुरू केली आहे. मतदारसंघातले दौरे वाढवले आहेत. सांगलीतूनही पक्षाची तयारी सुरू आहे. मात्र तिथे सध्यातरी कोणाचंही नाव चर्चेत नाही. त्यामुळे ऐनवेळी कोणता उमेदवार पुढे येतो ते पहावं लागेल.

पक्षाचे युवा नेते रविकांत तुपकर हे माढा आणि बुलढाणा या मतदारसंघातून तयारी करत आहेत. त्यांचा कल माढा मतदारसंघातूनच असल्याचं बोललं जातंय. त्यादृष्टीनं त्यांनी माढामध्ये दौरे सुरू केले आहेत. माढा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्रशासनातला एक बडा अधिकारी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. त्या अधिका-याने सध्या स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज केल्याची माहिती आहे. त्यामुळे तुपकक जर बुलढाण्यातून लढले तर तो बडा अधिकारी माढ्यातून लढण्याची शक्यता आहे. तर वर्धा मतदारसंघातून सुबोध मोहिती रिंगणात उतरणार आहेत. तशी तयारी त्यांनी सुरू केली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबतच्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय झाला तर स्वाभिमानीला यामधील काही जागांवर पाणी सोडावे लागेल. जर शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय झाला तरीही काही जागांवर तडजोड करावी लागेल. मात्र सध्या कुठल्या आघाडीकडून लढणार हे निश्चित नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या मतदारंसधामध्ये तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून सरकारविरोधात अधिक आक्रमता आणली जात आहे. दोनच दिवसांपूर्वी पुण्यात साखर आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. तर पुढच्या काही दिवसात मुंबईत येणारं दूध रोखण्याचा इशारा पक्षाकडून देण्यात आला आहे.

COMMENTS