नवी दिल्ली – मराठा आरक्षणाचा मुद्दा मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात गाजला आहे. राज्यसभेत छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला तर लोकसभेत शिवसेना खासदार विनायक राऊत आणि राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. राज्यसभेत संभाजी राजे यांनी मराठीतच हा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी संभाजी राजे यांना खडे बोलही सुनावले. मराठा आरक्षणाची मागणी मी समजू शकतो, मात्र मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणे चुकीचं असल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शाहू महाराजांनी भारतात पहिल्यांदा बहुजन समाजाला आरक्षण दिले होते. यात मागासवर्गीय समाजासह मराठा समाजालाही स्थान होते. पण स्वातंत्र्यानंतर आरक्षणात मराठा समाजाला स्थान देण्यात आले नाही. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने तीव्र भावना झाल्या आहेत. गेल्या वर्षी अनेक मोर्चे निघाले, त्याची दखल देशाने घेतली. आता मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील सर्व घटकांना बोलवावे आणि त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याची मागणी संभाजी राजे यांनी केली आहे. तसेच याचे राजकारण करण्यापेक्षा सर्वपक्षीय लोकांना एकत्र आणून तोडगा काढण्याची मागणीही संभाजी राजे यांनी केली आहे. यावरुन राज्यातील मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनाचे पडसाद आता दिल्लीपर्यंत पोहचले असल्याचं दिसत आहे.
COMMENTS