मुंबई – माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचे लहानपणीचे प्रशिक्षक रमांकात आचरेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. गेले दोन,तीन दिवस आचरेकर सरांची तब्येत बरी नव्हती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते उपचारानाही उत्तम प्रतिसाद देत होते. पण संध्याकाळी 5.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थीवावर गुरुवारी सकाळी 10.30- 11 च्या सुमारास, शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, बलविंदरसिंह संधू अशा अनेक खेळाडूंना आचरेकर सरांनी मार्गदर्शन केलं. आचरेकर सरांच्या दोन मुली आजही क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून नवीन मुलांना प्रशिक्षण देत आहेत.
शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे यांसारखे आंतरराष्ट्रीय स्तरावर तळपणारे क्रिकेटपटू आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनाने घडवले. त्यामुळेच आचरेकरांना क्रिकेटचे भीष्माचार्य म्हणून ओळखले गेले. पद्मश्री पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने क्रीडाक्षेत्राची मोठीच हानी झाली आहे. क्रिकेटविश्वाला गुरुस्थानी असलेल्या रमाकांत आचरेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
COMMENTS