दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं मनोमिलन !

दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं मनोमिलन !

मुंबई – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि दलित पँथरचे संस्थापक नेते, ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले या आंबेडकरी चळवळीतील दोन दिग्गज नेत्यांची ग्रेट भेट झाली आहे. आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या घाटकोपर पूर्वेच्या माता रमाबाई आंबेडकर नगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला साक्ष ठेवीत या दोन दिग्गजांचे मनोमिलन झाले. तब्बल 40 वर्षांनंतर ढाले -आठवलेंची भेट झाल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

येथील गंधकुटी बुद्धविहारामागे पँथर नेते राजा ढाले यांचे कार्यलय आहे. या कार्यालायत रामदास आठवलेंनी राजा ढालेंची सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांनी एकमेकांशी दिलखुलास संवाद साधला. या भेटीत दोघांच्याही स्नेहसंबंधांत प्रेमाची साखरपेरणी करणारा सुसंवाद यावेळी झाला. 40 वर्ष एकमेकांना न भेटलेल्या या नेत्यांनी एकमेकांशी केलेले हस्तांदोलन ऐतिहासिक ठरले आहे. ढाले – आठवले यांच्या या ग्रेट भेटीने आंबेडकरी चळवळीत नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

“रामदास आठवले लीडर झाले कारण पाठीशी उभे राहिले राजा ढाले ” असे मनोगत व्यक्त करीत राजा ढालेंमुळेच आपणास प्रेरणा मिळाली . आपण पँथरमध्ये काम सुरू केले. त्यांचे  मार्गदर्शन आपणास नेहमीच मिळाले आहे. ते आंबेडकरी चळवळीचे साहित्यिक, ज्येष्ठ विचारवंत आणि पँथरचे संस्थापक नेते आहेत.  त्यांचा आपण नेहमीच आदर करीत आलो आहोत असे रामदास आठवले यावेळी म्हणाले. रमाबाई आंबेडकर नगरात त्यांच्या संस्थेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या वलंगकर ग्रंथालय आणि संशोधन केंद्राच्या संकल्पित दुमजली इमारतीसाठी आपल्या खासदरनिधीतून 40 लाख रुपयांचा निधी देण्यात येईल अशी घोषणा यावेळी रामदास आठवलेंनी केली. तसेच लवकरच राजा ढाले यांचा वाढदिवस अराजकीय समिती तर्फे करण्यात येईल. त्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. समाजातर्फे राजा ढालेंना 15 लाखांची थैली देऊन सन्मानित करण्यात येईल असा संकल्प रामदास आठवलेंनी व्यक्त केला.

राजकारणात कोणी कुणाचा कायमचा क्षत्रू नसतो असे सांगत आपण सर्व आंबेडकरवादी एकच आहोत. चळवळीतुन संधीसाधूंना हद्दपार केले पाहिजे. रमाबाई आंबेडकर नगर चळवळीचे केंद्र आहे. येथे समाजाच्या उपयोगी वस्तू उभारावी. ग्रंथालय, सनदी अधिकारी निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र, संशोधन केंद्र उभारावे अशी अपेक्षा राजा ढालेंनी यावेळी व्यक्त केली. पुष्पगुछ शाल देऊन राजा ढालेंनी रामदास आठवलेंचा तसाच आठवलेंनी ही ढालेंचा सत्कार केला. यावेळी  राजा ढाले यांची कन्या गाथा आणि नातू उन्नयन तसेच रिपाइंचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS